|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » सात आठवडय़ानंतर पहिल्यांदाच सप्ताही घसरण

सात आठवडय़ानंतर पहिल्यांदाच सप्ताही घसरण 

बीएसई सेन्सेक्स 147, एनएसई निफ्टी 52 अंकाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजार सलग दुसऱया सत्रात तेजीने बंद झाला. रुपयामध्ये तेजी दिसून आल्याने वाहन कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली होती. परवान्यापासून इलेक्ट्रिक कार आणि पर्यायी इंधनावर धावणाऱया गाडय़ांची मुक्तता करण्यात आल्याने वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात खरेदी झाली.

बीएसईचा सेन्सेक्स 147 अंकाने मजबूत होत 38,389 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 52 अंकाच्या तेजीने 11,589 वर स्थिरावला. सप्ताहाची कामगिरी पाहता सेन्सेक्स 255 आणि निफ्टी 91 अंकाने कमजोर झाले.

रुपयामध्ये तेजी आल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने बाजाराने पलटी घेतली. वाहन कंपन्यांच्या समभाग तेजी आली, तर मिडकॅप निर्देशांकात करेक्शन झाल्यानंतर आता सकारात्मक संकेत मिळत आहेत. मूल्याबाबत बाजार अजूनही महाग दिसत आहे असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्समध्ये हीरो मोटोकॉर्प 5.27 टक्के आणि बजाज ऑटो 5.06 टक्क्यांनी वधारले. याव्यतिरिक्त महिंदा ऍण्ड महिंद्रा 4.12 टक्के, टाटा मोटर्स 2.80 टक्के, अशोक लेलँड 1.54 टक्के आणि टीव्हीएस मोटार 3.68 टक्क्यांनी मजबूत झाले.भारती एअरटेल, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिवर, रिलायन्स इन्डस्ट्रीज, विप्रो, ऍक्सिस बँक, कोल इंडिया, एनटीपीसी, वेदान्ता, इन्फोसिस, एशियन पेन्ट्स, टीसीएस 4.98 टक्क्यांपर्यंत वधारले. येस बँकेचा 4.59 टक्क्यांनी घसरल्याने चार महिन्यांच्या निचांकावर पोहोचला आहे. हलोल प्रकल्पात तपासणी करण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या एफडीएकडून सांगण्यात आल्याने सन फार्मा 1.84 टक्क्यांनी घसरला.

दूरसंचार निर्देशांक 3.35 टक्के, वाहन 2.07 टक्के, धातू 1.96 टक्के, आरोग्यसेवा 0.89 टक्के, तेल आणि वायू 0.79 टक्क्यांनी वधारले. ऊर्जा, बँकिंग, आणि इन्फ्रास्ट्रक्चर निर्देशांक घसरत बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.15 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.55 टक्क्यांनी वधारले. आशियाई बाजारातही समिश्र व्यवहार दिसून आले.