|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रेल्वेच्या हत्ती बचाव मोहिमेला मोठे यश

रेल्वेच्या हत्ती बचाव मोहिमेला मोठे यश 

प्लॅन बी यशस्वी : गोयल यांनी दिली माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेचा उपक्रम ‘प्लॅन बी’मुळे रेल्वे दुघटनेतील हत्तींचे मृत्यू रोखण्यास यश मिळत आहे. रेल्वेमार्ग ओलांडताना हत्ती रेल्वेला धडकत असल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. अशाप्रकारच्या दुर्घटना रोखण्यासाठी नॉर्थईस्ट प्रंटियर रेल्वेने (एनएफआर) मागील वर्षी प्लॅन बी अवलंबिला होता.

या उपक्रमांतर्गत रेल्वेमार्गावर विशेष प्रकारची ध्वनियंत्रे बसविण्यात आली आहेत. या यंत्रांमधून मधमाशासारखा आवाज निघत असल्याने हत्ती रेल्वेमार्गापासून दूर राहतात आणि रेल्वे दुर्घटनांचे बळी होण्यापासून बचावतात.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी ‘प्लॅन बी’चे यश सांगत ट्विटरवर चित्रफित प्रसारित केली. रेल्वेने हत्तींना दुर्घटनेपासून वाचविण्यासाठी ‘प्लॅन बी’ अंतर्गत रेल्वे-क्रॉसिंगवर बसविलेल्या ध्वनियंत्राचा लाभ दिसून आला आहे. मधमाशाप्रमाणे आवाज काढणाऱया यंत्रामुळे हत्ती रेल्वेमार्गापासून लांब राहत असल्याचे गोयल यांनी सांगितले. ध्वनियंत्रातून मधमाशांनी पाठलाग चालविल्याचा आवाज निघतो, हा आवाज हत्ती 600 मीटर अंतरावरूनच ऐकू शकतात.

देशाच्या कित्येक भागात रेल्वेक्रॉसिंगवर हत्ती रेल्वेगाडय़ांना धडकल्याने दुर्घटना घडत असतात. 2014 ते 2016 या कालावधीत रेल्वेमार्गावर 35 हत्तींचा मृत्यू झाला. तर जुलै 2017 पर्यंत अशा दुर्घटनांमध्ये 5 हत्तींना जीव गमवावा लागल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेश गोहेन यांनी दिली आहे.

Related posts: