|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जम्मू-काश्मीरला मिळाले नवे पोलीस प्रमुख

जम्मू-काश्मीरला मिळाले नवे पोलीस प्रमुख 

वैद यांची बदली : दिलबाग सिंग यांच्याकडे धुरा : दहशतवादविरोधी मोहिमांना येणार वेग

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये एस.पी. वैद यांना हटवून दिलबाग सिंग यांच्याकडे पोलीस विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचदरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी राज्य पोलिसप्रमुखांच्या बदलीतील कथित घिसाडघाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैद यांच्या बदलीत अशी घाई दाखविणे चुकीचे आहे. कायमस्वरुपी व्यवस्था होईपर्यंत ही बदली टाळली जाणे योग्य ठरले असते असा दावा त्यांनी केला.

काश्मीर खोऱयात काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱयांच्या 8 नातेवाईकांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात अटकेतील दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना सोडावे लागले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैद यांना हटविण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पदभार सांभाळल्याच्या काही दिवसांतच वैद यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये कपात केली होती. ज्यात मोहिमात्मक निधीला मंजुरी देण्याचा अधिकार देखील सामील होता.

नवे पोलीस प्रमुख

दिलबाग सिंग यांना सध्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त प्रभार मिळाला आहे. श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयात दहशतवाद्यांनी हल्ला करून पाकिस्तानी दहशतवादी अबू हंजूलाला पळवून नेले होते. या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण पत्करावे लागले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या या घटनेनंतर 1987 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी दिलबाग सिंग यांना तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती मिळाली होती.

स्वतंत्र ओळख निर्माण

तुरुंग विभागाचे महासंचालक म्हणून दिलबाग सिंग यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. यात राज्यातील तुरुंगात कैद दहशतवाद्यांबद्दल त्यांनी नव्या व्यूहनीतीवर काम केले. यात खोऱयातील अनेक क्रूर दहशतवाद्यांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय देखील सामील आहे. परंतु युपीएससीकडून शिक्कामोर्तब झाल्यावरच त्यांची पोलीस महासंचालक पदावर स्थायी नियुक्ती होईल.