|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » डोनाल्ड ट्रम्प विरोधी लेखकावरून सट्टेबाजीला ऊत

डोनाल्ड ट्रम्प विरोधी लेखकावरून सट्टेबाजीला ऊत 

उपाध्यक्ष पेन्स यांच्यावर संशय : द न्यूयॉर्क टाईम्समध्ये निनावी लेख, राजकीय घडामोडींना वेग

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेतील वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाईम्समध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निनावी लेख लिहिणाऱया वरिष्ठ अधिकाऱयाच्या ओळखीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर सट्टेबाजांनी अधिकाऱयाच्या नावावरून सट्टा घेण्यास प्रारंभ केला आहे. यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यावर सर्वाधिक संशय व्यक्त केला जातोय. परंतु या यादीत विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांचे नाव देखील सामील आहे.

देशाच्या राजकारणात लवकरच मोठा बदल दिसून येऊ शकतो, ज्यासाठी सट्टेबाज तयार असल्याचे अमेरिकेची गॅम्बलिंग वेबसाइट मायबुकीचे व्यवस्थापकीय संचालक जॅक स्लेटर यांनी सांगितले. त्यांच्या संकेतस्थळाने लेख लिहिणाऱयाच्या अचूक ओळखीसाठी 100 डॉलर्सची (सुमारे 7200 रुपये) अट ठेवली आहे. जिंकणाऱयास दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.

आतापर्यंत 5 हजार डॉलर्सचा (3.60 लाख रुपये) सट्टा लावण्यात आला असून यात सर्वाधिक रक्कम उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यावर लावण्यात आली आहे. जॅक यांच्यानुसार शिक्षणमंत्री बेट्से डेवॉस आणि विदेशमंत्री माईक पॉम्पियो दुसऱया स्थानावर आहेत. सैन्यप्रमुख जॉन केली आणि अर्थसचिव स्टीव्हन मनुचिन यांना सट्टेबाजांनी तिसऱया क्रमांकावर ठेवले आहे.

सर्व आरोप चुकीचे

लेखात नमूद करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. न्यूयॉर्क टाईम्स अपयशी ठरत आहे. मी पदावर राहिलो नाही तर द न्यूयॉर्क टाईम्स देखील बाजारात राहणार नाही. वृत्तपत्राने मांडलेला मुद्दा प्रशासनातील मतभेदांचा भाग असून आम्ही यावर योग्य पावले उचलत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले.

वादग्रस्त कार्यकाळ

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची व्हाइट हाउसमधील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. परंतु आता त्यांचे सहकारी देखील त्यांच्या विरोधात उतरल्याचे दिसून येते. द न्यूयॉर्क टाईम्समधील निनावी लेख याचेच द्योतक मानले जात आहे. ट्रम्प यांची कार्यपद्धत अमेरिकेच्या लोकशाहीसाठी हानिकारक असल्याचे लेखकाने म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी लेख आणि लेखकाला ‘देशद्रोह’ तसेच ‘भ्याड’ ठरविले आहे.

काय आहे प्रकरण

अमेरिकेच्या एका पदाधिकाऱयाने बुधवारी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये ‘आय ऍम पार्ट ऑफ रेजिस्टेंस इनसाइट द ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन’ या मथळय़ाने लेख लिहिला होता. यात अधिकाऱयाचा नावाचा खुलासा करण्यात आला नव्हता. या लेखाला व्हाइट हाउसने भ्याड कृत्य ठरविले आहे.