|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » सेरेना-ओसाका यांच्यात जेतेपदासाठी लढत

सेरेना-ओसाका यांच्यात जेतेपदासाठी लढत 

वृत्तसंस्था/न्युयॉर्क

येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉपसिडेड सेरेना विलियम्स तसेच जपानची नाओमी ओसाका यांच्यात महिला एकेरीच्या अजिंक्यपदासाठी शनिवारी लढत होईल.

36 वर्षीय सेरेनाने आतापर्यंत सहावेळा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. आता ती 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. महिला विभागात 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम असून सेरेना या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. अमेरिकेच्या माजी महिला टेनिसपटू ख्रिस एव्हर्टच्या नावावर हा विक्रम आजपर्यंत अबाधित राहिला आहे.

सेरेनाने गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात लॅटव्हियाच्या 29 वर्षीय ऍनास्टेशिया सेव्हास्टोव्हाचा 6-3, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. सेरेनाने हा सामना 66 मिनिटात जिंकला. सेरेनाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 31 ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. सेरेनाचा शनिवारी जेतेपदासाठी जपानच्या ओसाकाशी सामना होईल. सात महिन्यापूर्वी सेरेनाने टेनिसमध्ये आपले पुनरागमन केले होते. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या विंबल्डन गँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण जर्मनीच्या केर्बर्रकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. 2018 च्या टेनिस हंगामात सेरेनाने सलग दुसऱया ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.

गेल्यावर्षी या स्पर्धेत अमेरिकेच्या स्टिफेन्सने महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते. पण यावेळी स्टिफेन्सचे आव्हान लवकरच संपुष्टात आले. जपानच्या 20 वर्षीय नाओमी ओसाकाने गुरुवारी झालेल्या उपांत्यसामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 6-2, 6-4 असा पराभव केला. ओसाकाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्यावर्षी मॅडिसन किजने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. ओसाकाने चालू वर्षामध्ये इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. तिचे कारकिर्दीतील हे पहिले जेतेपद ठरले आहे. किजने गुरुवारी उपांत्यफेरीचा सामना दीड तासाच्या कालावधीत जिंकला.