|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » कनिष्ठ नेमबाजांची सोनेरी घोडदौड कायम

कनिष्ठ नेमबाजांची सोनेरी घोडदौड कायम 

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक

चांगवान-दक्षिण कोरिया / वृत्तसंस्था

भारताच्या कनिष्ठ नेमबाजांची येथील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील घोडदौड शुक्रवारी देखील कायम राहिली. भारताला त्यांनी दिवसभरात 2 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक संपादन करुन दिले. हृदय हझारिकाने 10 मीटर एअर रायफल तर महिलांच्या सांघिक गटात नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण खाऱयावर जमा झाले. त्यानंतर इलाव्हेनिल वॅल्वेरियनने महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये वैयक्तिक रौप्य संपादन केले. इलाव्हेनिलची चीनच्या शी मेंगयाओ हिच्याशी बरीच स्पर्धा रंगली. अंतिमतः मेंगयाओने निसटत्या फरकाने त्यात बाजी मारली.

इलाव्हेनिलने 249.8 अंक प्राप्त केले तर मेंगयाओने 250.5 अंकांसह बाजी मारली. 17 वर्षीय श्रेया अगरवालने 228.4 अंकांसह कांस्यपदकाची कमाई केली. ही या स्पर्धेची 52 वी आवृत्ती आहे.

यंदा या आवृत्तीतील सहाव्या दिवशी चार पदक प्राप्त केल्यानंतर भारताची पदकसंख्या 18 वर पोहोचली. आयएसएसएफच्या एखाद्या स्पर्धेत भारतीय नेमबाजांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, झॅगरेब, क्रोएशिया येथे संपन्न झालेल्या 49 व्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताने 6 पदके जिंकली होती आणि तीच या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. यंदा मात्र त्यापेक्षा तिपटीने पदके जिंकत भारताने अव्वल कामगिरी नोंदवली आणि यात अर्थातच कनिष्ठ नेमबाजांची कामगिरी मोलाची ठरली.

पुरुषांच्या फायनलमध्ये हझारिका हा एकमेव भारतीय नेमबाज 627.3 अंकांसह पात्र ठरला. इराणच्या मोहम्मद आमीर नेकोनमशी 250.1 अंकांसह त्याची बरोबरी झाली होती. पण, शूटऑफमध्ये त्याने रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. रशियाच्या ग्रिगोरी शामकोव्हने 228.6 अंकांसह कांस्य मिळवले. वैयक्तिक नेम मालिका सुरु झाल्यानंतर त्याने सातत्याने 10 अंक मिळवले आणि यामुळे तो 0.5 अंकांनी पुढे होता.

22 व्या फटक्यापर्यंत तो नेकोनमपेक्षा आघाडीवर होता. नंतर 24 व्या फटक्यावर 9.4 अंकांवर समाधान मानावे लागल्यानंतर उभयतात 250.1 अंकांसह बरोबरी झाली. शूटऑफमध्ये हझारिकाने 10.3 अंक प्राप्त केले तर इराणच्या नेकोनमला 10.2 अंकांवर थांबावे लागले.

महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये इलाव्हेनिल (631), श्रेया अगरवाल (628.5), मनिनी कौशिक (621.2) यांनी 1880.7 अंकांचा नवा विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. इलाव्हेनिनेही येथे नवा कनिष्ठ विश्वविक्रम रचला.

पुरुषांच्या गटात हृदय हझारिका, दिव्यांश पनवर व अर्जुन बबुता यांना 1872.3 अंकांसह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. वरिष्ठांच्या पुरुष गटात 50 मीटर्स एअर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये भारताच्या पदरी सपशेल निराशा आली. या इव्हेंटमध्ये भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरी गाठता आली नाही. आशियाई रौप्यजेता संजीव रजपूत 1167 अशा निचांकी अंकांसह तळाच्या स्थानी राहिला. स्वप्नील कुसळेला 1161 अंकांसह 55 व्या तर अखिल शेरॉनला 1167 अंकांसह 44 व्या स्थानी समाधान मानावे लागले.

सांघिक गटात भारताला 3503 अंकांसह 11 वे स्थान मिळाले. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये टिनेजर मनू भाकरने भारतीयात सर्वोत्तम स्थान प्राप्त केले. आशियाई चॅम्पियन राही सरनोबत 289 अंकांसह 27 व्या तर आशियाई कांस्यजेती हिना सिद्धू 284 अंकांसह 61 व्या स्थानी राहिली.