|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » आरंभशूर इंग्लंडची इशांतसमोर दाणादाण!

आरंभशूर इंग्लंडची इशांतसमोर दाणादाण! 

1 बाद 133 नंतर दिवसअखेर 7 बाद 198 पर्यंत पडझड, कूकच्या अर्धशतकानंतरही भारताची जोरदार मुसंडी

लंडन / वृत्तसंस्था

जलद गोलंदाज इशांत शर्माने भेदक मारा साकारत तिहेरी धक्के दिल्यानंतर भारताने जोरदार मुसंडी मारत यजमान इंग्लंडला पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 7 बाद 198 धावांवर रोखले. निरोपाचा सामना खेळत असलेल्या माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने येथे 71 धावांची शानदार खेळी साकारली. पण, तिसऱया सत्रात इशांतच्या भेदक माऱयाने चांगलीच सनसनाटी माजवली. त्याने 28 धावात 3 बळी घेतले तर जसप्रीत बुमराह (2-41), रवींद्र जडेजा (2-57) यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

33 वर्षीय कूकने 190 चेंडूंचा सामना करताना आपल्या शेवटच्या सामन्यातील पहिला डाव सार्थकी लावला. पण, दिवसभरातील तिसऱया सत्रात भारताने केवळ 58 धावांमध्येच 6 फलंदाज बाद करत या लढतीत जोरदार मुसंडी मारली. या पडझडीमुळे इंग्लंडची 1 बाद 131 वरुन 7 बाद 181 अशी दाणादाण उडाली.

यजमान संघ 1 बाद 133 अशा भरभक्कम स्थितीत असताना बुमराहने कूक व रुट (0) यांना डावातील 64 व्या षटकात लागोपाठ चेंडूंवर बाद केले तर त्यानंतर इशांतने पुढील षटकातच जॉनी बेअरस्टोचा शून्यावर त्रिफळा उडवत इंग्लंडला 4 बाद 134 अशा अडचणीच्या परिस्थितीत आणून सोडले.

मोईन अलीने 170 चेंडूत 50 धावांची संयमी खेळी साकारत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, इशांतने 83 व्या षटकात 3 चेंडूतच 2 फलंदाज बाद करत इंग्लंडला सनसनाटी गोलंदाजी काय असते, याचा चांगलाच दाखला दिला. शमीने दिवसभर अनेक स्पेलमध्ये उत्तम गोलंदाजी केली. पण, एकही बळी मिळाला नसल्याने तो कमनशिबी ठरला.

चहापानानंतर बुमराह व इशांत यांनी खऱया अर्थाने भेदक मारा साकारत इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकणे भाग पाडले आणि हेच दिवसभरातील खेळाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

तत्पूर्वी, पहिल्या दोन सत्रात मात्र पूर्णपणे इंग्लंडचे वर्चस्व राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला शेवटचा सामना खेळत असलेल्या ऍलिस्टर कूकला भारतीय संघाने दुतर्फा उभे रहात मानवंदना दिली तर उपस्थित चाहत्यांनी देखील टाळय़ांच्या गजरात त्याचे स्वागत केले. प्रारंभी, कूकसह जेनिंग्सला देखील सूर सापडत नव्हता. भारतीय गोलंदाज बहरात होते. पण, नंतर या उभयतांनी काहीसा जम बसवत 60 धावांची सलामी दिली. जेनिंग्स (23) मोठी खेळी साकारु शकला नाही. मात्र, कूकने मोईन अलीसह दुसऱया गडय़ासाठी 73 धावा जोडत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला.

कूकच्या शानदार अर्धशतकामुळे इंग्लंडने उपाहारापर्यंत 28 षटकात 1 बाद 68 तर चहापानापर्यंत 59 षटकात 1 बाद 123 धावांपर्यंत मजल मारली होती. दिवसभरातील तिसऱया व शेवटच्या सत्रात मात्र त्यांची चांगलीच दाणादाण उडाली.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव : ऍलिस्टर कूक त्रि. गो. बुमराह 71 (190 चेंडूत 8 चौकार), केटॉन जेनिंग्स झे. राहुल, गो. जडेजा 23 (75 चेंडूत 2 चौकार), मोईन अली झे. पंत, गो. इशांत 50 (170 चेंडूत 4 चौकार), जो रुट पायचीत गो. बुमराह 0 (3 चेंडू), बेअरस्टो झे. पंत, गो. इशांत 0 (4 चेंडू), बेन स्टोक्स पायचीत गो. जडेजा 11 (40 चेंडूत 2 चौकार), जोस बटलर खेळत आहे 11 (31 चेंडूत 1 चौकार), करण झे. पंत, गो. इशांत 0 (2 चेंडू), अब्दुल रशीद खेळत आहे 4 (25 चेंडू). अवांतर 28. एकूण 90 षटकात 7/198.

गडी बाद होण्याचा क्रम

1-60 (जेनिंग्स, 23.1), 2-133 (कूक, 63.2), 3-133 (रुट, 63.5), 4-134 (बेअरस्टो, 64.4), 5-171 (स्टोक्स, 77.5), 6-177 (मोईन, 82.3), 7-181 (करण, 82.5)

गोलंदाजी

जसप्रीत बुमराह 21-9-41-2, इशांत शर्मा 22-10-28-3, हनुमा विहारी 1-0-1-0, मोहम्मद शमी 22-7-43-0, रवींद्र जडेजा 24-0-57-2.