|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध

आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात  महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटत असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. बुधवारी कोल्हापुरात  विविध  संघटनांनी  आमदार कदम यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.  युवा सेनेसह  भारतीय महिला फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन यांनी निदर्शने केली.

युवा सेना

भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई येथे दहीहंडीच्या ठिकाणी एखादी मुलगी आवडली तर सांगा पळवून आणून लग्न लावून देतो, असे महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा युवा सेनेच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी हर्षल सुर्वे यांच्या उपस्थितीत निषेध व्यक्त केला.

हर्षल सुर्वे म्हणाले, मुंबई येथील दहीहंडीच्या उद्घाटनासाठी भाजप आमदार राम कदम उपस्थित झाले होते. येथे एक अभिनेत्रीही उपस्थित होती. ती बोलत होती म्हणून दहीहंडी फोडण्यासाठी थर रचलेल्या युवकांना खाली उतरवले.  तसेच माझा फोन नंबर देतो, तुम्हाला कोण मुलगी आवडली तर सांगा तुमच्या आईवडिलांची परवानगी घेवून, संबंधीत मुलगी असेल तेथून पळवून आणून तिचे तुमच्याशी लग्न लावून देवू, असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधी हे समाजाचे रक्षक असतात त्यांनीच महिलांचा अपमान करणे त्यांना शोभत नाही. तसेच यापुर्वीही भाजपच्या बऱयाच आमदारांनी महिलांचा अपमान केला आहे. या आमदारांना सत्तेचा माज आला आहे, अशा शब्दात हर्षल सुर्वे यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी रणजीत आयरेकर, सागर पाटील, मंजीत माने, विनायक जाधव, प्रफुल्ल घोरपडे, सागर पंतोजी, शरद चौगुले, राकेश पाटील, सचिन पोवार, विनायक कुंभार, चैतन्य अष्टेकर, सागर पंतोजी आदी उपस्थित होते.

भारतीय महिला फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे आमदार राम कदम यांचा निषेध

मुंबई येथील दहीहंडी कार्यक्रमात तरूणांसमोर बोलताना तरूणींना पळवून आणू, असे महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा भारतीय महिला फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनच्या वतीने बिंदू चौकात निषेध करण्यात आला.

उमा पानसरे म्हणाल्या मनूवादी प्रवृत्तीचे भाजप नेते महिलांना शोभेची वस्तू समजतात. त्यामुळेच वारंवार महिलांचा अपमान करणारे वक्तव्य करतात. आमदार कदम यांनी आपल्या वक्तव्यातून महिलांना पळवून नेण्यासंदर्भात तरूणांच्या भावना चेतावल्या आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध तर केलाच पाहिजे पण त्यांना योग्य ती शिक्षाही मिळाली पाहिजे. 

सुनिता अमृतसागर म्हणाल्या, भाजप सरकार संविधानाच्या विरोधात असून मनूवादी प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे महिलांचा अपमान करणारे वक्तव्य भाजप लोकप्रतिनिधीकडून वारंवार केले जाते. भाजपच्या ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ या वाक्यापेक्षा भाजप नेत्यांकडून ‘बेटी बचाव’ अशी परिस्थिती देशभर निर्माण झाली आहे. 

 सुमन पाटील,स्नेहल कांबळे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर यांनीही तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी आशा कुकडे,  शुभांगी पाटील, आशा बरगे, हरिश कांबळे, पवन रजपूत, दिक्षा रजपूत, अमोल देवडकर, सौरभ पिवाळ, योगेश कसबे, कृष्णा पानसे, राजेंद्र यादव, सूरज सूर्यवंशी, सुमेध रानडे, शिवशंकर पांचाल,  मिना चव्हाण, दिलीप कोळी आदी उपस्थित होते.