|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अधटरावच्या निलंबनाचा ठराव बहुमताने मंजूर

अधटरावच्या निलंबनाचा ठराव बहुमताने मंजूर 

पंढरपूर / प्रतिनिधी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदावर सचिन अधटराव यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव आज बहुमताने मंजूर करण्यात आला. सदरचा प्रस्ताव तात्काळ विधी व न्याय खात्यांकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर अधटराव यांचे निलंबन होईल, असा विश्वास मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.      विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची आज बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसापूर्वी दर्शनाचा काळाबाजार उघडकीस आला होता. त्यानंतर मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांना याप्रकरणी अटक देखिल झाली होती. त्यानंतर विधी व न्याय खात्याच्या सल्ल्याने आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तात्काळ या ठरावाची प्रत आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

याचबरोबरीने या बैठकीत सदस्य सचिन अधटराव यांनी देखिल त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फ्ढारसा काही उपयोग झाला नाही. तसेच आगामी काळात काळाबाजाराला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर टोकन दर्शन व्यवस्था निर्माण करण्याकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले.

टोकन दर्शन व्यवस्थेसाठी गोपाळपूर येथील पत्राशेडच्या जागेमध्ये मोठमोठे हॉल उभे करण्यात येणार आहे. या हॉलमधून थेट स्कायवॉकने भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था होणार आहे. यासाठी एका भक्ताने देणगी देण्याचे आश्वासन समितीला दिले आहे. त्यानुसार याबाबत पुढील पंधरा दिवसात आराखडा तयार करून निर्णय होणार असल्याचे सांगितले.

तसेच आगामी काळात मंदिर समितीचा कोणताही सदस्य अथवा कर्मचारी हे जर गैरकृत्य करताना आढळून आले. त्यावर निश्चितच स्वरूपात कायदेशीर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे सांगितले.

एकंदर आजच्या बैठकीत दर्शन व्यवस्था आणि अपारदर्शकतेंच्या मुद्यावर घमासान चर्चा झाली. विशेष म्हणजे आजची बैठक ही कडक बंदोबस्तामध्ये आणि  बंद कुलुपामध्ये झाली. 

विशेष म्हणजे या बैठकीत अधटराव यांच्यानंतर आ. राम कदमाच्या वक्तव्यावर देखिल चर्चा झाली. आ. राम कदम मंदिर समितीचे सदस्य आहेत. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसच्या महीला पदाधिकारी यांनी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीने महिलांचा संताप शांत करण्यात आला. समिती अध्यक्ष अतुल भोसलेंचे वाहन रवाना करण्यात आले.

औसकरांचा अहवाल नाहीच

मंदिरातील दर्शनाच्या काळाबाजारप्रकरणी मंदिर समितीचे तत्कालीन नित्योपचार समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती जानेवारी 2018 मध्ये नेमण्यात आली होती. सदर चौकशी समितीचा अहवाल अद्याप समितीस प्राप्त झाला नसल्याची माहिती अतुल भोसले यांनी दिली.