|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहीद जवानांच्या नावाची कोनशीला उभारण्यात यावी

शहीद जवानांच्या नावाची कोनशीला उभारण्यात यावी 

प्रतिनिधी/ वाई

नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील नागरी कुटुंब कल्याण केंद्रात समन्वयक या पदावरुन सेवानिवृत्त झालेले कर्मचारी संदेश चव्हाण यांना सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ, तसेच शासनाने लागू केलेला 6 वा वेतन आयोग अदा करणे, नगरपरिषद कर्मचारी कविता मुळीक यांना शासनाने लागू केलेला 6 वा वेतन आयोग अदा करण्यास नगरपरिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भात शासनास खोटी माहिती पुरवून नगरपालिका प्रशासनाला वेठीस धरणारे आस्थापना अधिकारी भास्कर यांची त्रिसदस्यीय समितीद्वारे खातेनिहाय चौकशी करण्याची जोरदार मागणी उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केली. यावेळी उपस्थित सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत नगरपालिका कर्मचाऱयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासंदर्भात विशेष सभा बोलविण्याची आग्रही मागणी अनिल सावंत व राजेश गुरव यांनी केली.

वाई नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विद्या पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते. सभेच्या अजेंडय़ावर तब्बल 63 विषय होते. त्यातील काही विषयावर तसेच आयत्या वेळच्या विषयांवर सभागृहात बराच खल झाला. यावेळी प्रशासनाने नेहमीप्रमाणे आळीमिळी गुपचिळी अशी आपली संदिग्ध भूमिका कायम ठेवली. अजेंडय़ावरील क्र. 14 ते 63 या विषयांचे प्रस्ताव सभेची नोटीस काढण्यापूर्वी वेळेत सादर न झाल्याने सदरचे विषय कार्यालयीन टिपण्या मंजूर करून पुढील बैठकीत मांडण्याचा निर्णय झाला.

लाईट बिलावरून सभागृहात जोरदार खडाजंगी

मागील सभेचा सभावृत्तांत कायम करणे या विषयावर बोलताना नगरसेवक चरण गायकवाड यांनी, तहकूब विषय मंजूर करण्यावर आक्षेप घेतला. याविषयी नगराध्यक्षांनी उपसूचना स्वीकारल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगत याबाबतचा निर्णय सामंजस्यानेच घ्यावा लागेल, अशी माहिती मुख्याधिकारी पोळ यांनी दिली. नगरसेवक प्रदीप चोरगे यांनीही याबाबत हरकत नोंदवली. पालिकेच्या जलतरण तलावाचे रु. 1 लाख इतके लाईट बिल भरण्याच्या विषयावर सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. याबाबतच्या करारात लाईट बिल पालिकेनेच भरावयाचे आहे, असे नमूद असतानाही त्यावर पुन्हा चर्चा कशाला? असा प्रश्न चरण गायकवाड यांनी उपस्थित केला. हुतात्मा स्मारक दुरुस्ती व नूतनीकरण या विषयावर बोलताना विरोधी पक्षनेते सतीश वैराट यांनी याठिकाणी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच शहीद जवानांच्या नावाची कोनशीला उभारण्यात यावी, अशी सूचना केली. तसेच याठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाला बैठकीसाठी सुविधा पुरवावी, अशीही मागणी त्यांनी केली. केवळ कायद्यावर बोट ठेवून कारभार करण्यापेक्षा सर्वांच्या समन्वयातून कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी भूमिका ऍड. श्रीकांत चव्हाण यांनी मांडली. शहरात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने योग्य जनजागृती करावी, अशी सूचना उपनगराध्यक्ष सावंत यांनी केली. याबाबत लोकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत असे मत गटनेते भारत खामकर, प्रदीप चोरगे यांनी व्यक्त केले.

मुदत संपलेल्या गाळ्यांची 25 टक्के भाडेवाढ

सोनगीरवाडी येथे विकसित करण्यात येणाऱया वाहतूक बेट आणि परिसराचा विकास व सुशोभीकरण कामातील विद्युत वाहिनीचा अडथळा त्वरित दूर करण्याची मागणी महेंद्र धनवे यांनी केली. तसेच अनेक गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू असल्याची माहिती नगरसेविका वासंती ढेकाणे व विरोधी पक्षनेते सतीश वैराट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मुदत संपलेल्या गाळ्यांची 25 टक्के भाडेवाढ करून वसूली होत असल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली. पालिकेने राबवलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानासाठी वापरण्यात आलेल्या ट्रक्टर आणि जेसीबीची डिझेल बिले आजपर्यंत मिळाली नसल्याबाबत सतीश वैराट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेतील इतर विषयांवरील चर्चेत नगरसेविका रुपाली वनारसे, रेश्मा जायगुडे, नगरसेवक दीपक ओसवाल आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुरूदास कामत, राष्ट्रसंत तरुणसागर, हनुमंत पाटणे, भानुदास कांबळे, अनुराधा देशपांडे, तसेच केरळमध्ये अतीवृष्टीत निधन पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मकरंद पाटील, विजयाताई भोसले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप, सुभाष डांगे आदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. विषय पत्रिकेचे वाचन चंद्रकांत गुजर यांनी केले. यावेळी नगरसेविका प्रियांका डोंगरे, आरती कांबळे, शीतल शिंदे, स्मिता हगीर, सीमा नायकवडी, सुमैय्या इनामदार, किशोर बागुल, विकास काटेकर आदी सदस्य उपस्थित होते.

Related posts: