|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा »

 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश चित्रशाळा जागू लागल्या आहेत. गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गणेश मूर्ती रंगविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. तालुक्यात एकूण 15 हजार पेक्षा अधिक मूर्ती बनविण्यात येतात. गेल्या कित्येक वर्षापासून मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम सत्तरी तालुक्यातील अनेक गावात चालते. बदलत्या जमान्यानुसार विविध गणेश मूर्ती बनविण्याच्या कामातही अमुलाग्र बदल होत असून विविध प्रकारच्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे.

होंडा येथील मूर्तीकार दीपक गावकर यांनी गेल्या तीन महिन्यापासून आपल्या शाळेत गणेश मूर्ती बनविण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. आपण साधारणपणे 150 गणेश मूर्ती बनवितो. चिकन माती व शाडू मातीचे दर प्रचंड वाढले असल्यामुळे कमी किंमतीत गणेशमूर्ती देणे आता आव्हानात्मक बनले आहे. हे आव्हान स्वीकारून आधुनिक रंगसंगतीचा अवलंब करून आकर्षक गणेशमूर्ती ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. पाल येथील मूर्तीकार बुधाजी गावकर यांनी अनेक वर्षापासून आपल्या घराण्यात गणेशमूर्ती बनविण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. दरवर्षी आपल्या शाळेत गणेशमूर्तीची संख्या वाढत असून आगावू नोंदणी करूनच गणेशभक्त आपल्याकडून आपल्याला हवी तशी गणेशमूर्ती बनवून घेतात. अनेकजण शास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्तीला अधिक पसंती देतात, असेही ते म्हणाले.

चतुर्थीला आता केवळ आठवडा शिल्लक असल्याने गणेशमूर्ती रंगविण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे. अनेक शाळांमध्ये गणेशमूर्ती रंगविण्याचे काम पूर्ण झाले असून नजर आखणीच्या कामांना सुरूवात झाली आहे. यासाठी सध्या गणेश चित्रशाळा रात्रीही जागू लागल्या आहेत.