|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आर्थिक विकास महामंडळास 86.45 कोटी नफा

आर्थिक विकास महामंडळास 86.45 कोटी नफा 

 

प्रतिनिधी/ पणजी

आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) 2017-18 या वर्षात एकूण 86.45 कोटी एवढा विक्रमी नफा कमावला असून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रमांसाठी रु. पाच कोटी खर्च करण्यात येणार आहे. ईडीसीने 2017-18 मध्ये एकूण रु. 117.48 कोटी महसुली उत्पन्न मिळवले असून कर वजा केल्यानंतर निव्वड नफा रु. 56.35 कोटी एवढा झाल्याचे त्यानी नमूद केले.

महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. नफ्यातील रु. 14.38 कोटी एवढी रक्कम राज्य सरकारच्या ईडीसी पार्किंग जागेच्या संपादनाचे व्याज म्हणून देण्यात येणार आहे. 2017-18 या सालात महामंडळाने रु. 197.82 कोटीची कर्जे देण्यात आली. त्या वर्षी रु. 263.80 कोटीची कर्जे वसूल होऊन एकूण कर्जाची रु. 886.16 एवढी थकबाकी येणे असल्याचे कुंकळकर यांनी नमूद केले.

दक्षिण गोवा जिल्हय़ातील लोकांना सोयीचे व्हावे म्हणून मडगाव येथे बसस्थानकाजवळ ईडीसीची शाखा सुरु करण्यात आली असून तेथे सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी पणजीला येण्याची आता गरज नाही. काणकोण-सांगे व इतर तालुक्यातील नवीन उद्योजकांची त्यामुळे सोय झाली असल्याचे ते म्हणाले.

ईडीसीतर्फे चालवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेत थोडी सुधारणा करण्यात आली असून ती अधिकाअधिक लोकप्रिय होत आहे. त्य़ा योजनेसाठी असलेली वयोमर्यादा आता 45 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. उत्पन्नाची मर्यादा प्रतीवर्ष रु. 10 लाखापर्यत नेण्यात आली आहे.

मंजुरी प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली असून व्यवस्थापकीय संचालकांना त्या योजनेचे अधिकार देण्यात आले आहेत. महामंडळाने आतापर्यंत 6600 उद्योजकांना रु. 147 कोटी मंजूर केले असून प्रत्यक्षात मात्र रु. 149.49 कोटी वितरित केल्याची माहिती देण्यात आली. ईडीसी हाऊसमध्ये इनब्युशन सेंटर सुरु करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची जबाबदारी ईडीसीवर सोपवण्यात आली आहे.