|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणारा अधिकारी निलंबित

पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणारा अधिकारी निलंबित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

साखर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे कामगारांना जीव गमवावा लागल्याने, कारवाई करणाऱया एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या कारखान्यावर कारवाई झाली, तो कारखाना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचा परवाना रद्द करणाऱया अधिकाऱयाचे निलंबन तर केलेच, पण कारखान्याचा परवानाही पूर्ववत केला.

कारखान्यातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचा ठपका वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ठेवला होता. बीडमधील परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात 8 डिसेंबर 2017 रोजी रसाच्या टाकीचा स्फोट झाला होता. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. इतकेच नाही तर अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली होती. तपासणीदरम्यान या कारखान्यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. जीएमपी म्हणजेच गुडस् मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेसच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी या कारखान्याची तपासणी करुन परवाना रद्द केला होता. मात्र, या कारखान्याला परवाना देण्याचे काम एफडीएच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे केरुरेंनी अधिकाराचा गैरवापर केला, असे कारण देत एफडीएने त्यांच्यावर तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. इतकेच नाही तर पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईसुद्धा मागे घेण्यात आली. कारखान्याचा रद्द झालेला परवाना पुन्हा बहाल करण्यात आला. मात्र प्रश्न हा आहे की अधिकारक्षेत्र कोणाचेही असले, तरी ज्या त्रुटी आढळल्या आहेत, नियमांची पायमल्ली केल्याचे निदर्शनास आले आहे त्याचे काय? ज्या चुकांमुळे 7 कामगारांना जीव गमवावा लागला त्याप्रकरणी कोणावर कारवाई करायची? अधिकारक्षेत्र बदललं तर त्रुटी बदलणार आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. सर्वच सहकारी कारखाने सहकार निबंधकांच्या अखत्यारित येतात. घटनेला वर्ष होत आले, मात्र एफडीएच्या पाहणी अहवालावर सहकार निबंधकांनी काय कारवाई केली? तांत्रिक त्रुटी शोधून एफडीएच्या अधिकाऱयांचे निलंबन केले, पण या अधिकाऱयाने ज्या कारखान्याच्या त्रुटी शोधल्या त्या दुरुस्त झाल्या का? असे प्रश्न आहेत.

Related posts: