|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चाकरमान्यांचा प्रवास सुखकरच!

चाकरमान्यांचा प्रवास सुखकरच! 

खड्डे पाहणीनंतर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही : उद्यापर्यंत महामार्गाचे उर्वरित पॅचवर्क पूर्णत्वास!

घोटगे – सोनवडे घाट निविदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात

जमीनमालकांनी सहकार्य केले तर मे 2019 पर्यंत नवीन महामार्ग

कुडाळला उर्वरित भागातील काम सुरू करण्याचे आदेश

वार्ताहर / कणकवली:

महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे. आतापर्यंत बहुतांश मोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. गणेश चतुर्थीपर्यंत उर्वरित खड्डे बुजवून चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास सुखकर करण्यात येईल. महामार्गाच्या रखडलेल्या पुलांची कामे ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यात येतील. कणकवलीपर्यंत हायवेच्या एजन्सीने काम चांगले केले आहे. खड्डय़ांचे शिल्लक पॅच दहा सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील. कोकणात येणाऱया चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली असून वाशी टोलनाक्यावर गणेशभक्तांच्या वाहनांना स्टिकर देण्यात येणार आहेत. या टोलची रक्कम सरकार भरणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चिपळूण ते कणकवलीपर्यंतच्या महामार्गाच्या खड्डय़ांच्या पाहणी दौऱयानंतर कणकवलीत विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे, विकास सूर्यवंशी, मुख्य अभियंता विनय देशपांडे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ऑक्टोबरपर्यंत रखडलेल्या पुलांची कामे!

पाटील म्हणाले, गणेश चतुर्थी संपल्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाचा मी दरमहा दौरा करून आढावा घेणार आहे. भूसंपादनासाठी जर जमीनमालकांनी सहकार्य केले तर मे 2019 पर्यंत नवीन महामार्ग पूर्ण होईल. सततचा पाऊस व त्यानंतर संबंधित ठेकेदारांना बँकांनी फायनान्स न केल्याने निधी कमी पडला. त्यामुळे नवीन पुलांची कामे रखडली. मात्र, आता पुन्हा एकदा पुलांच्या कामांची टेंडर काढण्यात येणार असून सावित्री नदीवर ज्या कंपनीने पुलाचे बांधकाम केले अशा मोठय़ा ठेकेदाराकडून ही कामे पूर्ण करून घेण्यात येतील. ऑक्टोबरपर्यंत पुलांची कामे सुरू होतील.

फेरमूल्यांकनासाठी जिल्हाधिकारी आदेश देणार!

महामार्गाच्या चौपदरीकरणात बाधित जमिनीवर वने अशी नोंद असलेल्या काही भागात अद्याप काम सुरू नसल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, हा सरकारच्या अखत्यारीतील विषय असून जेवढा रस्ता होणार तेवढय़ा जागेत करण्याच्या सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत. कुडाळ शहरातील फ्लायओव्हर ब्रीज बनविण्याचा आराखडा व त्याच्या मंजुरीसाठी विलंब लागणार असल्याने या ठिकाणचे उर्वरित भागातील काम सुरू करण्याचे आदेश एजन्सीला देण्यात आले आहेत. तसेच चौपदरी रस्त्याचे काम करत असतांना अगोदर दुपदरी रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कणकवली व कुडाळ शहरापुरत्याच समस्या आहेत. जिल्हाधिकाऱयांकडे दाखल अपिले निकाली काढण्यात आली. ज्या इमारतींच्या फेरमूल्यांकनाची मागणी येणार त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज केल्यानंतर त्यांच्या पुनर्मूल्यांकनाबाबत आदेश जिल्हाधिकारी देणार आहेत.  भाडेकरुंच्या मोबदल्याप्रश्नी कायद्यात तरतूद नसल्याने मूळ मालकांनी भाडेकरुंबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

खासदार नारायण राणे यांच्यासोबत मागील दौऱयात झालेल्या भेटीदरम्यान त्यांना व आमदार नीतेश राणे यांना महामार्गातील तरतुदी समाजावून सांगितल्या. राणेंची ती भेट नव्हे; त्यांच्याकडे स्नेहभोजन होते, असेही पाटील यांनी सांगितले.

तोपर्यंत त्या रस्त्यांची जबाबदारी आमची!

हायब्रिड ऍन्युईटीच्या निकषामुळे राज्यमार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राज्यातील 137 रस्त्यांची टेंडर झाल्याचे स्पष्ट केले. त्यातील 94 ठिकाणी कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 26 ठिकाणची कामे सुरू करण्यात आली. तर 11 कामे प्रोसेसमध्ये आहेत, असे पाटील म्हणाले.

दर 15 दिवसांनी मराठा आरक्षणाचा प्रगती अहवाल

महसूल विभागातील अनेक कर्मचारी, अधिकारी लाचलुचपत विभागाच्या छाप्यात  सापडत असल्याने महसूल विभागात भ्रष्टाचार वाढला का, असा प्रश्न पाटील यांना केला असता त्यांनी भ्रष्टाचार आधीपासूनच होता. सरकारच्या पारदर्शक कारभारामुळे असे अधिकारी पकडले जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारची वेळकाढू भूमिका नसून उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे मागासवर्ग आयोगाला सांगितले आहे. तसे प्रतिज्ञापत्र आयोगाने न्यायालयाला दिले आहे. दर 15 दिवसांनी याबाबतचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर केला जात आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार, असेही पाटील म्हणाले.

अजून 40 महामंडळे शिल्लक

महामंडळावर नियुक्त्या देतांना कोकण व सिंधुदुर्ग जिह्यावर अन्याय झाला, याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता अजून 40 महामंडळांचे वाटप व्हायचे आहे. एक दिवसासाठी तुम्ही भाजप नेते व्हा. मग तुम्हाला कळेल वाटप करताना काय करावे लागते ते, असे सांगत याबाबत ‘सस्पेन्स’ कायम ठेवला. तर गेल्या चार वर्षात युतीबाबत मी साशंक नाही, असे सांगत युतीवर बोलणे टाळले.

घोटगे – सोनवडे घाटाच्या कामाच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्या असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर या कामाची फाईल ठेवण्यात येणार आहे. आठवडाभरात या समितीची बैठक झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येईल. अर्थसंकल्पात या कामासाठीच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दोन गुणांक शक्य नाही!

कणकवली शहरातील हायवे प्रकल्पग्रस्तांच्या 2 गुणांक देण्याच्या मागणीबाबत  पाटील म्हणाले, 2 गुणांक शहरी भागात होणार नाही. ग्रामीण भागासाठी 2 व शहरी भागासाठी 1 गुणांकाची कायद्यात तरतूद आहे. सिंधुदुर्गासाठी हा निकष बदलता येणार नाही.

43 हजार गावांचे संगणकीकृत सात-बारा पूर्ण

संगणकीकृत सात – बारांमध्ये झालेल्या चुकां दुरुस्तीसाठी खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याबाबत पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, खातेदारांच्या सोईसाठीच हा कार्यक्रम राबविण्यात आला. राज्यातील 43 हजार गावांचे सात – बारा संगणकीकरण झाले असून अडीच कोटीपैकी 40 लाख सात – बारांवर नायब तहसीलदारांच्या डिजिटल सह्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित सात – बारा क्लाऊडवर स्पेस उपलब्ध झाल्यावर अपलोड करण्यात येणार आहेत. हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या सात – बारां संगणकीकरणात चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याची पद्धत सोपी करण्यात येईल. याबाबत जिल्हाधिकाऱयांना सूचना देण्यात येतील. सात – बारा संगणकीकरणानंतर चावडी वाचन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सातबारा चावडीवर वाचन झाले नाहीत. ते केवळ चावडीवर लावण्यात आले.

राम कदम, विनोद तावडेंवर भाष्य टाळले

आमदार राम कदम व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पाटील यांचे लक्ष वेधले असता आज मी हायवेच्या विषयासाठी आलो आहे. तो विषय आता नको, असे सांगत याबाबत बोलणे टाळले.