|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘ढाई किलो के’ दात!

‘ढाई किलो के’ दात! 

जांभवडे-भूतवळच्या 62 वर्षीय अपंग वृद्धाच्या दातांमधील अनोखी ताकद : नारळ सोलणे जणू ‘किस झाड की पत्ती’

  • एक हजार नारळ दाताने सोलण्याचा विक्रम
  • एकाचवेळी सलग 25 नारळ सोलण्याची क्षमता
  • केवळ तीन ते चार मिनिटांत सोलला जातो नारळ

 

भरत सातोस्कर / वेंगुर्ले:

‘यह ढाई किलो का हाथ जब किसी पे पडता है ना..।’ हा सनी देवोलचा फिल्मी डायलॉग खूपच लोकप्रिय झाला. अर्थात हा डायलॉग फिल्मी असला, तरी तगडय़ा सनी देवोलला बिलकुल शोभायचा. सिंधुदुर्गातील जांभवडे-भूतवळ (ता. कुडाळ) येथील असाच एक अवलिया संतान आवेलीन फर्नांडिस आपल्या मजबूत दातांनी असाच ‘फेमस’ झाला आहे. विशेष म्हणजे संतान यांचे वय आहे 62 वर्षे. ज्या वयात अनेकांच्या तोंडात ‘कवळी’ येते, असे वय. पण हा अवलिया दाताने नारळ सोलतो. तीन ते चार मिनिटात अख्खा नारळ सोलतो. असे सलग 25, तर एका बैठकीत मध्येमध्ये थांबून हजार नारळ सोलण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. आणखी एक विशेष म्हणजे हा अवलिया जन्मजात हातापायांनी अपंग आहे.

आई-वडिलांचे छत्र अकालीच हरपलेले जांभवडे-भूतवळ (ता. कुडाळ) येथील संतान आवेलीन फर्नांडिस हे 62 व्या वर्षीही केवळ तीन ते चार मिनिटांत सुक्या सोडणातील नारळ आपल्या दाताने सोलतात. अपंग म्हणून नोंद असलेल्या संतान फर्नांडिस यांनी सावंतवाडी, कुडाळ व कसाल येथील कार्यक्रमात एक हजार नारळ सोलण्याचा विक्रम केला आहे. आजही जेथे-जेथे अपंग मेळावे भरविले जातात, त्या ठिकाणी त्यांना खास निमंत्रित केले जाते आणि तेही अपंगांनी मनाने खचू नये, हा संदेश आपल्या कृतीतून देत असतात.

आई-वडिलांचे छत्र हरपले

संतान आवेलीन फर्नांडिस यांचा जन्म 1 जानेवारी 1957 रोजी झाला. फोंडा (कणकवली) येथील आजीकडेच तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले. दोन्ही हात व पाय यांना जन्मतः अपंगत्व असल्याने पुढील शिक्षण घेणे त्यांना कठीण झाल्याने त्यांचे शिक्षण अर्धवटच राहिले. त्यांचे वडील पोष्ट खात्यात नोकरीला होते, तर आई गृहिणी होती. 1984 मध्ये त्यांची आईचे निधन झाले. या दुःखातून सावरेपर्यंत साधारण दोन वर्षात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. या आघातांमुळे त्यांच्या मनावर गंभीर आघात तर झालाच, पण त्यासोबतच रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. सुरुवातीच्या काळात पाळीव जनावरे गुरे चरविण्यासाठी नेण्याचा व ती आणण्याच्या प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी त्याचा मेहनतानाच दिला नाही. त्यानंतर आचरा येथून मच्छी आणून ती विकण्याचे प्रयत्न केले. मात्र, वाहन नसल्याने तो व्यवसाय परवडला नाही. त्यामुळे अखेरीस साल्वासाव आल्बेटा भुतोरो यांच्या पिठाच्या चक्कीवर काम करू लागले.

वेगळे काहीतरी करण्याचा संकल्प

साधारण 15 वर्षांपूर्वी जिद्द आणि आत्मविश्वासाने जगायचे आणि जगाला वेगळे काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा संकल्प त्यांनी केला. यातूनच सुक्या सोडणाचा नारळ दाताने सोलण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांना चांगल्या प्रकारे नारळ सोलता येऊ लागले. आणि याच कलेतून त्यांनी अपंगांना जिद्दीने जगा हा संदेश देण्यास सुरू केले.

घरात नाही वीज, नाही पाणी

जांभवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इंदिरा आवास योजनेंतर्गत घर बांधले. त्यासाठी गावातील त्यांच्या एका समाज बांधवाने स्वतःची जमीनही दिली. सुमारे 68 हजार रुपयांच्या खर्चातून त्यांनी सहा वर्षांपूर्वी घर बांधले. मात्र, महावितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज करूनही त्यांच्या घरात आजही अंधारच आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्जही केला. मात्र, पाणी कनेक्शनही मिळाले नाही. त्यांना आधाराशिवाय चालता येत नसल्यामुळे दूरवर असणाऱया विहिरीचे पाणी आणू शकत नाहीत. शासनाच्या संजय गांधी योजनेतून दरमहा मिळणारे 600 रुपये हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. अलिकडे अपंग मेळाव्यांमधून बक्षीस रुपात त्यांना काही रक्कम मिळते.

चुली विकण्याचा व्यवसायही बंद

जांभेथर दगडाची (चिऱयाची) चूल बनविण्याचा व्यवसायही त्यांनी करून पाहिला. एका जांभा दगडाचा आकार 13 इंच लांब, रुंदी 9 इंच व जाडी 7 इंच असते. या दगडाची किंमत 40 रुपये, तो दगड घरापर्यंत आणण्यासाठी 10 रुपये मजुरी  त्या दगडाची चूल बनविण्यासाठी येणारा एकूण खर्च 100 रुपये असतो. हा त्यांचा व्यवसाय काही कालावधीपुरताच चालला. मात्र, घरोघरी गॅस येत असल्याने हा व्यवसायही अल्पकाळाचाच ठरला. चुलीसाठी घेतलेले दगडही अद्याप शिल्लक आहेत.

ठोस उत्पन्नाची गरज

साईकृपा अपंग संस्था, ओरोस व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, वेंगुर्ले या अपंग संस्थांचे ते सदस्य आहेत. शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे त्यांना दोन वर्षांपूर्वी तीन चाकी सायकल, तर महिन्यापूर्वी दोन कुबडय़ा मिळाल्या. मात्र, प्रत्यक्षात उदरनिर्वाहासाठी ठोस उत्पन्नाची त्यांना गरज आहे. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित केलेल्या वेंगुर्ले येथील दिव्यांगाच्या मेळाव्यात त्यांनी सादर केलेल्या दाताने नारळ सोलण्याचे कौशल्याच्या कार्यक्रमास एक हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

..तर होऊ शकतो स्वावलंबी – फर्नांडिस

अपंगांना इंजिन असणारी तीन चाकी गाडी मिळते. ही गाडी मिळाली, तर आपण स्वावलंबी होऊ शकतो. आपणाला मच्छीमारी व्यवसाय खरेदी-विक्रीची माहिती आहे. या गाडीसाठी आपण वर्षभरापूर्वी समाजकल्याण विभागाकडे मागणी केली होती. मात्र, वयोमर्यादेमुळे आपली मागणी नाकारण्यात आली. अपंगांना सन्मानाने वागणूक देणाऱया शासनाने वयोवृध्द अपंगासाठी पेन्शन वा मानधन योजना राबविलेली नाही. त्यामुळे अपंग व्यक्ती संजीव गांधी निराधार योजनेच्या मासिक 600 रुपयांमध्ये उदरनिर्वाह कसा करणार याचा विचार शासनाने करायला हवा, असे संतान फर्नांडिस यांनी सांगितले.

रुपाली पाटील

उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणार!

निराधार असलेल्या संतान यांना शासनाच्या आधाराची गरज आहे. दिव्यांगांसाठीच्या योजनांमधून त्यांना आधार मिळावा, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कायमस्वरुपी उपाय करण्याचा प्रयत्न साहस प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहेत, असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांनी सांगितले.

मुंबईत होणार सन्मान

मुंबई येथील गुलगुले फाऊंडेशनच्या पुढाकाराने मुंबई येथे आर. एस. एस.चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत 22 डिसेंबरला अपंग मेळावा होत आहे. या मेळाव्यात संतान फर्नांडिस यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांनी पाठविला होता. हा प्रस्ताव आयोजकांनी मान्य केला असून या मेळाव्यात संतान फर्नांडिस यांना गुलगुले फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गेली दहा वर्षे सोलताहेत नारळ

संतान हे तीन ते चार मिनिटात एक नारळ आपल्या दाताने सोलतात. एकाच वेळी सलग 25 नारळ न थांबता सोलतात. पुढील पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर नारळ सोलतात. गेली दहा वर्षे सातत्याने ते सुक्या सोडणातील नारळ सोलतात. सुक्या सोडणातील नारळ सोलणे ही कठीण गोष्ट असते. मात्र, संतान हे वयाच्या 62 व्या वर्षीही दातांनी नारळ सोलतात. नारळ सोलताना अपंगत्व असलेल्या हातांचा आधार ते घेतात. तसेच अपंगत्व असलेले पाय त्यावेळी जोराने एकमेकांवर दाबले गेलेले असतात. नारळ सोलतानाची ते करीत असलेली प्रक्रिया पाहून पाहणारा थक्क होऊन जातो.