|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » कोकणकन्या शमिका भिडेची गणेशभक्तांना सुरेल भेट

कोकणकन्या शमिका भिडेची गणेशभक्तांना सुरेल भेट 

ऑनलाईन टीम / पुणे

‘टाइम्स म्युझिक’तर्फे आरती सोशल मीडियावर प्रसारित, ‘ऑफ बीट आर्टिस्ट’द्वारे चित्रिकरण

 

कोकणकन्या म्हणून महाराष्ट्राला परिचयाची असलेली गायिका शमिका भिडे हिने यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांसाठी आरतीची खास सुरेल भेट आणली आहे. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही पारंपरिक आरती शमिकाच्या सुरांत वेगळ्या चालीत टाइम्स म्युझिककडून यू टय़ुब चॅनेलद्वारे सोशल मीडियावर शनिवारी 8 सप्टेंबर रोजी प्रसारित करण्यात आली. या आरतीला संगीतकार गौरव कोरगावकर यांनी संगीतबद्ध केले असून, रत्नागिरीतील ‘ऑफ बिट्स’च्या छायाचित्रकारांनी चित्रीत केली आहे.

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या आरतीचे नुकतेच रत्नागिरीत शमिकाच्या कोकणातील घरी चित्रिकरण करण्यात आले. विशेष म्हणजे या चित्रिकरणाद्वारे शमिकाचे कुटुंबीयही रसिकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये शमिकाचे बाबा श्रीकांत भिडे, बहीण राधिका भिडे आणि आजी वसुधा भिडे भेटीला येत आहेत. तसेच प्रिया गोखले, अभिजित भट, बालकलाकार ईरा गोखले, प्रत्युष पेठे, अर्णव जोगळेकर हेही भेटीला येत आहेत. या व्हिडिओतील सुबक मूर्ती मूर्तीकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे. शमिकाचा हा नॉन फिल्म तिसरा अल्बम आहे. याचे उत्तम दर्जाचे चित्रिकरण रत्नागिरीतील ‘ऑफ बिट आर्टिस्ट’च्या छायाचित्रकारांनी केले आहे. याचा डिओपी विनय बुटाला, परेश राजिवले, श्रीपाद पिलणकर यांनी केले असून सुभाष मोरे व साई माचकर हे पॅमेरामन आहेत. तर एडिटिंग निखिल पाडावे, लाईटस् प्रथमेश कोटकर, मेकअप तेजश्री पिलणकर, तर समन्वयक म्हणून सिद्धेश बंदरकर व अभिजित भट यांनी काम पाहिले आहे. गणपती बाप्पा सर्वांचा लाडका आहेच. त्याचे आगमन, विसर्जन आपण मिरवणुकीद्वारे जल्लोषात करतो. मात्र याचबरोबर बाप्पा घरी विराजनमान झाले असताना त्याच्या पूजाअर्चेतील महत्त्वपूर्ण असलेल्या आरतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. आजच्या मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही या तांत्रिक गोष्टींमुळे आरती उरकण्याकडेच आपला जास्त कल दिसून येतो. तर बाप्पाची आरतीही तितकीच मनोभावे केली पाहिजे. तसेच विसर्जनावेळी पर्यावरण रक्षणाचे भान ठेवण्याचा सामाजिक संदेशही शमिकाने या व्हिडिओमधून दिला आहे.