|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सोळा मिनिटात…अंतराळात…

सोळा मिनिटात…अंतराळात… 

सिंहावलोकन…

w          मानवरहित अंतराळ मोहीमा यशस्वी करण्यात भारताचा हातखंडा आहे. आपल्या अशा मोहिमांच्या यशाचे प्रमाण इतर विकसित देशांपेक्षाही अधिक आहे. तथापि, मानवसहित अंतराळ भ्रमण यापेक्षा कितीतरी भिन्न, अधिक धोकादायक, संवेदनशील आणि खर्चिक आहे.

w          अंतराळात मानवाला पाठविण्याच्या संकल्पनेचा उदय अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धातून झाला. एकमेकांवर अण्वस्त्रे डागणे शक्य व्हावे म्हणून आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा जन्म हेच या संकल्पनेचे मूळ असून तंत्रज्ञानाची प्राथमिक निर्मितीही यातूनच झाली आहे.

w          12 एप्रिल 1961 या दिवशी रशियाने प्रथम युरी गागारिन याची अंतराळात यशस्वी पाठवणी केली. तसेच मानवाला अंतराळात घेऊन जाण्याचा मान मिळविणारे ‘व्होस्टक-1’ हे प्रथम यान ठरले. एक प्रकारे हे अमेरिकेला आव्हान होते. ते तिने त्वरित स्वीकारले.

w          रशियावर मात करायची या ध्येयाने भारलेले अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी थेट चंद्रावरच मानव उतरविण्याच्या योजनेला उत्तेजन दिले. तत्पूर्वी अमेरिका व रशियाने 1957, 1958 आदी वर्षांमध्ये अंतराळात उपग्रह स्थिरावण्यात महत्वाचे यश मिळविले होते.

w          अमेरिकेने नंतर 1961 ते 1966 या कालखंडात अंतराळ वाहनांची ‘सॅटर्न’ मालिका विकसित केली. 1965-1966 या वर्षात अमेरिकने जेमिनी कार्यक्रमाअंतर्गत अनेक मानवसहित अंतराळ मोहीमा केल्या. अपोलो या यानमालिकेतून त्या यशस्वी करण्यात आल्या.

w          या काळात रशिया मौनव्रत धारण करून होता, पण स्वस्थ नव्हता. त्याने आपल्या व्होस्टक या एकव्यक्ती यानाचे रुपांतर तीन व्यक्तींच्या यानात करण्याचे कार्य आरंभले होते. रशियाच्या व्होस्टकने जणू अमेरिकेच्या जेमिनीशी अबोल स्पर्धाच आरंभली होती.

w          तथापि, रशियाला जेमिनीशी बरोबरी करण्यात यश येत नव्हते. त्यामुळे काही काळापुरती मोहीम आखडती घेण्यात आली. इकडे अमेरिकेने जेमिनी उड्डाणांचा धडाका लावला होता. अंतराळात सर्वात मोठी अडचण अत्यल्प गुरूत्वाकर्षणाची असते. त्यावर मात केली.

w          रशियाने प्रयत्न सोडले नव्हते. त्याने 3 व्यक्तींसाठी सोयुझ यानाची निर्मिती केली. तथापि, ते अंतराळात घेऊन जाण्याची क्षमता असणारा अग्निबाण तयार करणे शक्य झाले नाही. अमेरिकेशी चंद्र मोहीम स्पर्धेत मागे पडल्यानंतर त्याने अवकाश स्थानकावर लक्ष पेंद्रित केले.

w          अमेरिकेने अपोलो नंतर 1973 मध्ये स्कायलॅब मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नांनंतर तब्बल 171 दिवस अंतराळात मानव थांबविण्याचा विक्रम रचला. अखेर रशियाने स्पर्धा न करता अमेरिकेशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने प्रतिसाद दिला.

w          समझोत्यानुसार अमेरिकेने महत्वाची साधने रशियाला पुरविली. त्यामुळे सोयुझ मोहीम यशस्वी होऊ शकली. 1975 मध्ये अमेरिकेच्या अंतराळ वाहनातून रशियाचे यान पाठविण्यात आले. दोन्ही देशांच्या अंतराळवीरांनी अवकाशात हस्तांदोलन करून इतिहास घडविला.

w          त्यानंतर अनेकदा अमेरिका व इतर देशांचे अंतराळवीर अवकाशात वास्तव्य करून आले आहेत. अवकाशात मानव पाठविण्याची क्षमता चीननेही 1967 पर्यंत विकसित केली होती. या कालखंडात ब्रिटन, जपान आदी देशांनीही प्रयत्न केले, पण ते मध्येच सोडून देण्यात आले.

भारताचे वैशिष्टय़ न्यारेच…

w खरेतर भारताने अवकाश कार्यक्रमाला इतरांच्या मानाने उशीराच प्रारंभ केला. पण ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ या म्हणीप्रमाणे उशीरा प्रारंभ करूनही तसेच आर्थिक चणचण असतानाही इस्रोने आपल्या अंतराळ कार्यक्रमाला जगमान्यता मिळवून दिली आहे.

w आर्यभट या पहिल्या उपग्रहापासून भारताने आजवर असंख्य मानवरहित अंतराळ मोहीमा अत्यंत किफायतशीर खर्चात पार पाडल्या आहेत. सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त अंतराळ यश हे भारताचे आगळेवेगळे वैशिष्टय़ जगाला आश्चर्यचकित करणारे ठरले आहे.

w भारताच्या अग्निबाणावरून विकसित देशांनीही उपग्रह अवकाशात धाडले आहेत. यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा देशांनी अनेक उपग्रह अंतराळात पाठविले आहेत. भूस्थिर कक्षेत उपग्रह पाठविण्याचे तंत्रज्ञान भारताने विकसित केले आहे.

w एकाच वेळी 104 उपग्रह एकाच वाहनावरून अवकाशात सोडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर जमा आहे. हा उपक्रम आतापर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही. भारताची चंदयान मोहीमही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी. चंदावर घनस्वरूप पाणी आहे, हे चंद्रयानाने सिद्ध केले आहे.

w भारताने 2013-14 या काळात मंगळावर पाठविलेले मंगळयान ही जगातील आतापर्यंतची सर्वात अल्पखर्चिक मंगळमोहिम आहे. अमेरिकेच्या मंगळ मोहिमांच्या तुलनेत हा खर्च 10 टक्के होता. अंतराळ कार्यक्रमाचे व्यापारीकरणही
मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे.

w या पार्श्वभूमीवर भारताने समानव अंतराळ मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अवकाश यानात विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. मानवाला लागणारी सर्व साधनसामग्री, हवेचा साठा, वास्तव्यासाठी सुसज्ज जागा, विशेष प्रकारचे अन्न, द्रवरूप पदार्थ इत्यादी सोयी अनिवार्य.

चंद्रारोहण…

21 जुलै 1969 हा दिन मानवाच्या अंतराळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावा असा ठरला. या दिवशी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्राँग आणि बझ अल्ड्रिन
या दोन अंतराळवीरांनी चंद्रारोहण केले. आर्मस्ट्राँग
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला अंतराळनायक ठरला.

कसे असेल ‘गगनयान’…

w          गगनयान मोहीम पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावरची निम्नकक्षा मोहीम असेल. एकाचवेळी तीन अंतराळवीर आवकाशात सोडण्यात येतील. यानाचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार असून प्रक्षेपणापासून केवळ
16 मिनीटांमध्ये ते अंतराळात असतील.

w          अंतराळात त्यांना पाच ते सात दिवस ठेवण्याची योजना आहे. त्यानंतर अरबी समुद्रात गुजरातच्या सागरतटाच्या आसपास हे यान अंतराळवीरांसह परतणार आहे. यासाठी 2022 हा अंतिम कालावधी असेल. त्याच्या आत मोहीम पूर्ण करण्याचा निर्धार इस्रोने केला आहे.

w          अंतराळ वास्तव्यात अत्यल्प गुरूत्वाकर्षण स्थितीत अनेक प्रयोग केले जाणार आहेत. त्यांचा उद्देश मानवावर अत्यल्प गुरूत्वाकर्षणाचा परिणाम कसा होतो, तसेच नियंत्रित तापमान आणि दबावात कोणते बदल घडतात याचे निरीक्षण करण्याचा आहे. मोहीमेसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

w          अवकाशातील वास्तव्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अंतराळवीरांना विदेशात पाठविले जाणार आहे. कठोर परिक्षण आणि तशाच चाचण्यांनंतरच त्यांची अंतिम निवड होणार आहे. या मोहिमेतून 1 हजार 500 नवे रोजगार निर्माण होतील असे सरकारने प्रतिपादन केले आहे. अंतराळ गणवेश भारतातच निर्मिलेला आहे.

w          या मोहिमेला फ्रान्सचे सहकार्य लाभणार आहे. फ्रान्सने यासाठी विशेष तज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून मोहिमेच्या आखणीपासून ते तंत्रज्ञान विकासापर्यंत प्रत्येक टप्प्यात आवश्यकतेप्रमाणे या तज्ञांचे साहाय्य घेतले जाईल. भारताची ही पहिलीच मोहीम असल्याने सहकार्याची आवश्यकता.

अंतराळवीरांचे प्रशिक्षण…

शारीरिक प्रशिक्षण…

w अंतराळात वास्तव्यस्थिती अत्यंत कठीण असल्याने मोहिमेआधी अनेक दिवस तशी स्थिती निर्माण करून प्रशिक्षण दिले जाते.

w अमेरिकेत नासा व युरोपात काही ठिकाणी यासाठी विशेष स्थाने निर्माण करण्यात
आली आहेत. तेथे प्रशिक्षण दिले जाते.

w गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव अंतराळात जवळजवळ शून्य असतो. त्याची सवय करून घेणे हा शारीरिक प्रशिक्षणाचा प्रमुख भाग.

w बराच काळ अत्यंत छोटय़ा आणि बंदिस्त जागेत, कोठेही बाहेर जाण्याची सोय नाही, अशा स्थितीत सराव करून घेतला जातो.

w मर्यादित खाणे, पाण्याचा कमीतकमी उपयोग, विशिष्ट प्रकारे शरीराची स्वच्छता इत्यादी बाबींचा सराव करणे महत्वाचे असते.

मानसिक प्रशिक्षण…

w अंतराळात  कोणाच्याही सोबतीशिवाय
एकटय़ाने किंवा मर्यादित संख्येतील सहकाऱयांसमवेत राहण्यासाठी मनाची मोठी तयारी आणि धाडस लागते.

w अंतराळ वास्तव्य अत्यंत धोक्याचे असून थोडीशी तांत्रिक चूकही विनाश घडवू शकते. त्या तणावाखाली अनेक दिवस राहण्याचा सराव करणे महत्वाचे असते.

मोहिमेची व्यवहार्यता…

आक्षेप…

भारतासारख्या गरीब देशाने अशी खर्चिक मोहीम हाती घेण्यावर अनेकांचा आक्षेप आहे. अंतराळात मानव पाठवून काय साधणार, हा प्रश्न विचारला जातो. जग याबाबतीत बरेच पुढे गेले आहे. आपल्याला अंतराळविषयक माहिती हवी असेल तर इतर देशांकडून ती मिळू शकते. स्वतंत्र मोहिमा हाती घेण्यापेक्षा भारत इतर देशांच्या मोहिमांचा भाग बनू शकतो. ते अधिक किफायतशीर आहे, असे अनेक आक्षेप आहेत.

प्रत्युत्तर…

या प्रयोगांचा मुख्य हेतू तंत्रज्ञान विकास आहे. तो स्वबळावर होणे केव्हाही श्रेयस्कर आहे. विशिष्ट पातळीपर्यंत तंत्रज्ञान विकास झाल्यास भारत त्याचे व्यापारीकरण करून जगाला साहाय्य करू शकतो. ते एक उत्पन्नाचे साधन होऊ शकते. इतरांवर कायमचे अवलंबून राहण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे. भारतात मानवबळ स्वस्त असल्याने विकसित देशांपेक्षा आपला अशा मोहिमांचा खर्च कितीतरी कमी आहे.

भ्रमण कक्ष….

w          मानवसहित यानातील हा महत्वाचा भाग. यातच अंतराळवीरांचे वास्तव्य असते. त्याची रचना विशेष असून अंतराळातील प्रत्येक स्थिती लक्षात घेऊन केलेली असते. गगनयानामध्ये असे दोन कक्ष असतील. त्यापैकी एक बाहय़ तर एक मुख्य कक्ष असेल. मुख्य कक्षात अंतराळवीरांचे वास्तव्य असेल तर बाहय़ कक्ष त्यांना विविध सेवा पुरविण्यासाठी असेल.

w          मुख्य कक्ष 3.5 मीटर व्यासाचा दंडगोलाकृती असेल, तर सेवा कक्ष 7 मीटर व्यासाचा दंडगोलाकृती असेल. मुख्य कक्षाचे वजन 7 टन ठेवण्यात येणार आहे. मुख्य कक्षातील तापमान व दाब नियंत्रित राखण्याचे कार्य बाहय़ कक्ष करणार आहे. तसेच त्यात प्राणवायूचा साठा, आपत्कालीन स्थितीसाठी उपयुक्त जीवनसुरक्षा यंत्रणा, अन्न व पाणी, इतर वस्तू असतील.  

आणखी काही अविस्मरणीय दिवस…

ड 20 फेबुवारी 1962- जॉन ग्लेन अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन वीर

ड 16 जून 1963- व्हॅलेंटिना तेरेस्खोव्हा पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली महिला

ड 19 जुलै 1963- जोसेफ ए. वॉकर अंतराळविमान चालविणारा पहिला वीर

ड 18 मार्च 1965- ऍलेक्झी लेनॉव्ह याने यान सोडून अंतराळात चाल केली

ड 21 डिसेंबर 1968- तीन वीर पृथीची निम्नकक्षा ओलांडून अंतराळात गेले