|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » डबल ट्रप नेमबाजीत अंकुर मित्तलचा सुवर्णवेध

डबल ट्रप नेमबाजीत अंकुर मित्तलचा सुवर्णवेध 

जागतिक अजिंक्यपद नेमबाजी: सांघिक प्रकारातही अंकुरला कांस्य

वृत्तसंस्था / चाँगवान (दक्षिण कोरिया)

येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत हरियाणाचा स्टार नेमबाज अंकुर मित्तलने पुरुषांच्या डबल ट्रप प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. हा ऑलिम्पिक इव्हेंट नसल्यामुळे अंकुरला 2020 चा ऑलिम्पिक कोटा मिळालेला नाही. तसेच याच प्रकारात सांघिक गटात भारताच्या अंकुर मित्तल, असाब व शार्दुल विहान यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पदकतालिकेत भारत 7 सुवर्ण, 6 रौप्य व 6 कांस्य अशा एकूण 20 पदकासह तिसऱया स्थानावर आहे.

26 वर्षीय अंकुरने 150 पैकी 140 गुणाची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. चीनच्या यियांगला रौप्य तर स्लोवाकियाच्या हुबर्ट आंद्रेजला कांस्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, चुरशीच्या झालेल्या या प्रकारात 5 फेऱयानंतर अंकुर, यियांग व हुबर्ट यांचे 140 असे समसमान गुण झाले होते. यानंतर, शुटऑफमध्ये अंकुरने चार लक्ष्य अचूक साधत सुवर्णपदक जिंकले. यियांगला तीन तर हुबर्टला एकच लक्ष्य साधता आला आणि त्यामुळे त्यांना रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सांघिक गटात भारतीय संघात असाब मोहम्मद, अंकुर मित्तल व शार्दुल विहान यांचा समावेश होता. भारतीय संघाला 409 गुणासह कांस्यपदक मिळाले. इटलीने 411 गुणासह सुवर्ण तर चीनने 410 गुणासह रौप्य जिंकले.

महिलांची अपयशी मालिका कायम

महिलांत भारताच्या अंजुम मुदगिलला 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचसोबत 25 मी पिस्तूल प्रकारात मनू भाकर 584 गुणासह 10 व्या स्थानावर राहिली. या प्रकारात चीनने सुवर्ण तर इटलीने रौप्य व जपानने कांस्यपदक मिळवले. आतापर्यंत या स्पर्धेतून भारताच्या दोन नेमबाजांनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. पदकतालिकेत चीनने आपला दबदबा कायम राखला असून ते अव्वलस्थानावर आहेत. दक्षिण कोरिया दुसऱया स्थानी असून भारत तिसऱया स्थानी आहे.