|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » जेतेपदासाठी ज्योकोव्हिक-पोत्रो आज आमनेसामने

जेतेपदासाठी ज्योकोव्हिक-पोत्रो आज आमनेसामने 

वृत्तसंस्था/ पॅरिस

अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीत आज सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिक व जुआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यात जेतेपदासाठी निर्णायक लढत रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत नदालला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली लागल्यानंतर पोत्रोला पुढे चाल मिळाली तर दुसऱया उपांत्य लढतीत ज्योकोव्हिकने जपानच्या निशिकोरीला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पोत्रोविरुद्ध माघार घ्यावी लागली त्यावेळी नदाल 7-6 (7-3), 6-2 अशा फरकाने पिछाडीवर होता.

2010 मध्ये मनगटावर दोन मोठय़ा शस्त्रक्रिया करवून घ्यावे लागलेल्या डेल पोट्रोने अलीकडेच पुनरागमन केले असून ग्रँडस्लॅममध्ये आतापर्यंत नदालविरुद्ध झालेल्या तिन्ही लढतीत त्याला पराभव स्वीकारावे लागले होते. याशिवाय, एकूण 16 लढतीत 11 वेळा पोट्रोच्या पदरी निराशा आली आहे. 2009 मध्ये पोत्रोने नदालविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. पण, येथे महत्त्वपूर्ण उपांत्य लढतीत 69 मिनिटे रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये नदालची चांगलीच दमछाक झाली आणि त्यानंतर दुसऱया सेटमध्ये त्याला माघार घेणे भाग पडले. दुसऱया सेटमध्ये 2-1 अशा सर्व्हवरच त्याने ट्रेनरला पाचारण केले होते.

विद्यमान जेत्या नदालने यावेळी गुडघ्याला मसाज करुन घेतला. शिवाय, रिटेप केले. पण, लवकरच त्याला आणखी खेळणे शक्य नसल्याचे जाणवले आणि त्याने पंचांना आपण माघार घेत असल्याचे सांगितले. नदालला अलीकडे गुडघ्याच्या दुखापतीने चांगलेच त्रस्त केले केले असून याचा त्याला बऱयाचदा फटका बसत आला आहे.

ज्योकोव्हिकची आगेकूच

स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱया उपांत्य लढतीत सर्बियाच्या विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन ज्योकोव्हिकने 19 व्या मानांकित केई निशिकोरीला पराभूत करत जेतेपदाच्या निर्णायक लढतीत आपले स्थान निश्चित केले. ज्योकोव्हिकने 2 तास 22 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 6-3, 6-4, 6-2 असा विजय संपादन केला. दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या ज्योकोहिकने या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पोहोचण्याची ही आठवी वेळ आहे. त्याने 37 मिनिटातच पहिला सेट जिंकत वर्चस्वाचे इरादे स्पष्ट केले व पुढील सलग दोन सेट्समध्येही तोच करिष्मा कायम राखला.

निशिकोरीने दुसऱया सेटमध्ये नेटवर येत आक्रमक खेळ साकारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला अंतिमतः फारसे यश प्राप्त झाले नाही. गतवर्षी ज्योकोव्हिकला ढोपराच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. यंदा मात्र त्याने ती कसर भरुन काढण्याच्या इराद्याने अगदी थाटात अंतिम फेरी गाठली आहे. अर्थात, यंदा या स्पर्धेत 6 सामन्यात केवळ एकच सेट गमावणाऱया डेल पोट्रोविरुद्ध त्याला तांत्रिकदृष्टय़ा आणखी सरस खेळ साकारावा लागेल, हे स्पष्ट आहे.

पुरुष दुहेरीत ब्रायन-सॉक विजेते

या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या माईक ब्रायन व त्याचा राष्ट्रीय सहकारी जॅक सॉक या जोडीने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने लुकास्झ कुबोत व मार्सेलो यांना 6-3, 6-1 अशा फरकाने मात दिली. ब्रायनसाठी हे विक्रमे 18 वे पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

अंतिम फेरीतील दोन्ही संघसहकारी माजी विम्बल्डन विजेते असल्याने येथे त्यांच्यात चुरस रंगेल, अशी अपेक्षा होती. पण, ब्रायन व जॅक या जेडीने सरळ सेट्समध्ये विजय मिळवत लढतीतील हवाच काढून घेतली. ब्रायन व त्याचा जुळा भाऊ बॉब यांच्यानंतर एखाद्या अमेरिकन जोडीने पुरुष दुहेरीतील जेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 2012 मध्ये ब्रायन बंधू जेते ठरले होते. बॉबला यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर रहावे लागले आहे.