|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » यजमान संघाची शेपटी पुन्हा वळवळली

यजमान संघाची शेपटी पुन्हा वळवळली 

पाचवी कसोटी, दुसरा दिवस : बटलर-ब्रॉड यांची नवव्या गडय़ासाठी 98 धावांची भागीदारी

वृत्तसंस्था/ लंडन

जोस बटलर (133 चेंडूत 89) व स्टुअर्ट ब्रॉड (59 चेंडूत 38) या जोडीने नवव्या गडय़ासाठी चक्क 98 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारल्यानंतर यजमान इंग्लंडने भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 332 धावांचा डोंगर उभारला. इंग्लिश संघाने 7 बाद 198 या बिकट स्थितीतून मार्ग काढत ही मारलेली मजल लक्षवेधी तर ठरलीच. शिवाय, भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा देखील चव्हाटय़ावर आणणारी ठरली. प्रत्युत्तरात भारताने चहापानाअखेर 1 बाद 53 अशी सावध सुरुवात केली होती.

या मालिकेत भारतीय संघ 1-3 अशा फरकाने पिछाडीवर आहे, त्याचे एक कारण इंग्लंडची वळवळणारी शेपटी, हे देखील आहे आणि भारतीय गोलंदाजांना या अपयशाचा ससेमिरा शनिवारी पुन्हा कधी पाठीशी लागला, हे कळाले देखील नाही.

शनिवारी, या लढतीच्या दुसऱया दिवशी भारतीय गोलंदाजांना अपयश पदरी आले. मोहम्मद शमी (0-72) सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने फलंदाजांना सातत्याने चकवे दिले. पण, तरीही त्याला नशिबाची साथ लाभली नाही. अदिल रशिद (15) व बटलर यांनी पहिल्या तासाभरातच 45 धावांची भागीदारी साकारत इंग्लंडला 200 धावांचा टप्पा सर करुन दिला.

पुढे, बुमराहने (3-64) रशिदला पायचीत करत दिवसभरातील सातव्या षटकात भारताला पहिले यश प्राप्त करुन दिले. त्यानंतर बटलर व ब्रॉडचे इरादे मात्र अगदीच बुलंद होते आणि भारताचा एकही गोलंदाज त्यांना एक इंच देखील मागे ढकलू शकला नाही. बटलरने 84 चेंडूतच अर्धशतक साजरे केल्यानंतर इंग्लंडने 104 षटकात 250 धावांचा टप्पा सर केला तर ब्रॉडने देखील त्याला समयोचित साथ दिली. या जोडीने 19.4 षटकात 98 धावांची दमदार भागीदारी साकारत संघाला 300 धावांचा माईलस्टोन पार करुन दिला.

या मालिकेत पहिलीच कसोटी खेळणाऱया जडेजाने ब्रॉडला राहुलकरवी झेलबाद करत डोकेदुखी ठरणारी ही जोडी फोडली. पण, एव्हाना बरेच नुकसान होऊन गेले होते. ब्रॉडने 98 मिनिटे खेळपट्टीवर रहात 59 चेंडूत 38 धावा केल्या. त्यानंतर जोस बटलर शेवटच्या फलंदाजाच्या रुपाने बाद झाला. बटलरने 211 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 133 चेंडूत 89 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारताची सावध सुरुवात

त्यानंतर इंग्लंडच्या सर्वबाद 332 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने चहापानाअखेर 1 बाद 53 धावा जमवल्या. केएल राहुल 48 चेंडूत 4 चौकारांसह 35 तर चेतेश्वर पुजारा 54 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावांवर खेळत होते. शिखर धवनचा अपयशाचा सिलसिला मात्र या डावातही कायम राहिला. 6 चेंडूत 3 धावा जमवल्या असताना त्याला ब्रॉडने पायचीत केले.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव : (7 बाद 198 धावांवरुन पुढे) जोस बटलर झे. रहाणे, गो. जडेजा 89 (133 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), अब्दुल रशीद पायचीत गो. बुमराह 15 (51 चेंडूत 3 चौकार), स्टुअर्ट ब्रॉड झे. राहुल, गो. जडेजा 38 (59 चेंडूत 3 चौकार), जेम्स अँडरसन नाबाद 0 (5 चेंडू). अवांतर 35. एकूण 122 षटकात सर्वबाद 332.

गडी बाद होण्याचा क्रम

1-60 (जेनिंग्स, 23.1), 2-133 (कूक, 63.2), 3-133 (रुट, 63.5), 4-134 (बेअरस्टो, 64.4), 5-171 (स्टोक्स, 77.5), 6-177 (मोईन, 82.3), 7-181 (करण, 82.5), 8-214 (रशीद, 97.1), 9-312 (ब्रॉड, 117.3), 10-332 (बटलर, 121.6).

गोलंदाजी

जसप्रीत बुमराह 30-9-83-3, इशांत शर्मा 31-12-62-3, हनुमा विहारी 1-0-1-0, मोहम्मद शमी 30-7-72-0, रवींद्र जडेजा 30-0-79-4.

भारत पहिला डाव : केएल राहुल नाबाद 35 (48 चेंडूत 4 चौकार), शिखर धवन पायचीत गो. ब्रॉड 3 (6 चेंडू), चेतेश्वर पुजारा नाबाद 15 (54 चेंडूत 3 चौकार). एकूण 18 षटकात 1 बाद 53.

गडी बाद होण्याचा क्रम

1-6 (धवन, 1.1).

गोलंदाजी

अँडरसन 5-1-12-0, ब्रॉड 4-1-12-1, स्टोक्स 5-0-18-0, करण 2-0-2-0, मोईन अली 2-0-9-0.