|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरात दागिन्यांचे दुकान फोडले

शहरात दागिन्यांचे दुकान फोडले 

प्रतिनिधी/ सोलापूर

 शहरातील पोटफाडी चौक ते जोडबसण्णा चौकादरम्यान पद्मशाली चौकाजवळ असलेले महिंद्रकर ज्वेलर्स दुकान फोडून चोरटय़ाने सुमारे 3 लाख 34 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरीच्या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पद्मशाली चौक ते गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला जाणाऱया रस्त्यावर महिंद्रकर ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे सूर्यप्रकाश महिंद्रकर यांनी दुकान बंद केले होते. शनिवारी सकाळी सूर्यप्रकाश यांचा मुलगा शाळेला जाण्यासाठी निघाला असता, त्याला दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने सूर्यप्रकाश यांना माहिती दिली. सूर्यप्रकाश यांनी दुकानात येऊन पाहणी केली, त्यावेळी दुकानातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

चोरटय़ाने महिंद्रकर ज्वेलर्स मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्सही चोरुन नेला आहे. यामुळे तपासाच्या कामात थोडी अडचण ठरणार आहे. यानंतर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) मधुकर गायकवाड, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. शशिकांत महावरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिपाली काळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभंगराव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱयांनी तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सुचना केल्या. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करुन सोडून दिले.

यादरम्यान पोलिसांनी श्वानपथकाव्दारे चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पद्मशाली चौकाकडे काही अंतर गेल्यानंतर श्वान थांबले. दुकानातून काही अंतर पुढे आल्यानंतर चोरटा दुचाकीवरुन गेला असल्याचा कयास पोलीस लावत आहेत. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात सूर्यप्रकाश हिरालाल महिंद्रकर (वय 42, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, पद्मशाली चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रीलची सळई वाकवून चोरटा शिरला दुकानात

महिंद्रकर यांच्या दुकानाच्या दोन्ही बाजूने कट्टा आहे. यावर कुत्रे आणि इतर प्राणी येऊन बसू नयेत म्हणून महिंद्रकर यांनी ग्रील लावून तो भाग बंद केला आहे. दरम्यान कट्टा आणि ग्रीलमध्ये काही अंतर होते. चोरटय़ाने काही ग्रीलच्या काही सळया वाकवून त्यातून सरपटत आत प्रवेश केला. त्यानंतर कटावणीच्या मदतीने  कुलूप लावण्यासाठीच्या दोन्ही बाजूच्या पट्टया उचकटून दुकानातील सोने व चांदीचे दागिने चोरले.