|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बनावट नोटांच्या तपासासाठी एटीएसचे पथक सांगलीत

बनावट नोटांच्या तपासासाठी एटीएसचे पथक सांगलीत 

पाळेमुळे खणून काढण्यासाठी यंत्रणेचे जोरदार प्रयत्न

प्रतिनिधी/ सांगली

 सांगलीत पकडण्यात आलेल्या बनावट नोटा खपवणाऱया टोळीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरून या प्रकरणाच्या तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक  (एटीएस) सांगलीत दाखल झाले आहे. शुक्रवारी हे पथक दाखल झाले असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी तपासाला सुरवात केली आहे.

 त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे.  पोलीस अधीक्षक सुहेल  शर्मा यांनी दिली. बनावट नोटाप्रकरणी पश्चिम बंगाल कनेक्शन उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगली दौऱयावर असताना गरज पडल्यास या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसची मदत घेण्याची घोषणा केली होती. बनावट नोटांच्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार एटीएसचे पथक शुक्रवारीच  सांगलीत दाखल झाले आहे.

 बनावट नोटाप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने राज राजकुमार उज्जेनलाल सिंह, प्रेमविष्णू रोगा राफा, नरेंद्र आशापाल ठाकूर, सूरज ऊर्फ मनीष मल्ला ठाकुरी व जिलानी आशपाक शेख यांना मुंबईतून अटक केली. त्यांच्याकडून दोन हजारच्या तब्बल 123 बनावट नोटा हस्तगत गेल्या. टोळीची सखोल चौकशी केली असता, त्यांनी राज्यभरात पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.

चौकशीनंतर पश्चिम बंगालमधून नोटा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहितीही टोळीकडून समोर आली. लाखाच्या नोटा केवळ दहा हजारांना खरेदी करून, त्यांना चलनात आणल्या जात होत्या. या टोळीतील दोघे तीन वर्षांपासून हा धंदा करत असल्याचे समोर आले. त्यांचा पश्चिम बंगालमधील म्होरक्याचा शोध घेण्यासाठी आता एटीएसच्या सहकार्यामुळे पोलिसांना सहकार्य होणार आहे.