|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा !

महाडीकांच्या ‘गोविंदा’चा शिराळा विधानसभेच्या दहीहंडीवर डोळा ! 

युवराज निकम / इस्लामपूर

पेठनाक्याच्या महाडिकांचा गोविंदा तथा सम्राट महाडीक हे बेरकी आहेत. अल्प वयात राजकीय खेळी करण्यात ते पारंगत बनले आहेत. त्यातूनच त्यांनी पहिल्यांदा पेठ जिल्हा परिषदेची जीत साधली. त्यानंतर थेट सरपंच निवडणूकीत आईंना निवडून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. आता तर या गोविंदाने शिराळा विधानसभा मतदार संघावर डोळा ठेवून धडक मारली. महाडीक-राणे पॅटर्न राबवून शिराळ्याची दहीहंडी फोडण्याचा इरादा निश्चित झाला आहे.

   वनश्री नानासाहेब महाडिक यांनी पाठीमागील काळात दोन वेळा विधानपरिषद निवडणूक लढवून राज्याच्या राजकारणात जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. कोल्हापुरचे महाडिक आमदारकी व खासदारकीचे फड मारत असताना, पेठनाक्याचे महाडिक काहीसे मागे राहीले. पण वाळवा व शिराळ्याच्या राजकारणात ते नेहमीच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिले आहेत. या दोन्ही मतदार संघात त्यांनी सर्वानांच आलटून-पालटून मदत केली आहे. आता तर नानासाहेबांना दोन्ही पुत्र राहूल व सम्राट यांची मोलाची साथ मिळत आहे. राहूल यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शैक्षणिक कामातून संघटन केले आहे. तसेच सम्राट यांनीही राजकारण, समाजकारण, क्रिडा क्षेत्राच्या माध्यमातून युवकांचे भक्कम संघटन केले आहे.

   सम्राट महाडिक हे बेरकी आहेत. त्यांची राजकीय प्रगल्भता वाढत आहे. शिवाय टायमिंग साधण्यात ते पटाईत आहेत. येलूर जिल्हा परिषद मतदार संघापुरत्या  असणाऱया राजकीय वर्चस्वाची कोंडी फोडून त्यांनी गत वेळच्या जिल्हा परिषद निवडणूकीत पेठ मतदार संघावर कब्जा केला. परिणामी शिराळा विधानसभा मतदार संघात असणाऱया वाळव्यातील 48गावांत महाडिक गटाची ताकद वाढण्यास मदत झाली. त्या बळावरच योग्य टायमिंग साधून सम्राट यांनी पेठ ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला सरपंच आरक्षण पडल्यानंतर आई मिनाक्षीताई महाडिक यांना उतरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नानासाहेब, राहूल व सर्वच महाडिक कुटुबियांचा सामुहिक होता. पण येथील विजय संपादन करण्यासाठी खरी कंबर सम्राट यांनी कसली. आणि जीतही साधली. आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकांत हात घातला की, गुलाल ही किमया सम्राट यांनी साधली.

    सम्राट यांनी आता शिराळा विधानसभा मतदार संघाचे सन 2019 चे मिशन हाती घेतले आहे. स्वत:च्या वाढदिवसापासूच त्यांनी त्या मतदार संघाचा संपर्क वाढवला आहे. विविध उपक्रमांवर भर दिला आहे.आजपर्यंत जल्लोशात इस्लामपुरात साजरी होणारी दहिहंडी यावेळी शिराळ्यात सरकली. तिथेही अमाप प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांनी महाडिक युवा शक्तिची हंडी फोडली. पण महाडिक यांनी त्याच दिवशी खऱया अर्थाने शिराळा विधानसभेची दहिहंडी फोडण्याचा इरादा स्पष्ट केला. खा.धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी थेट सम्राट यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ही घोषणा पक्षीय झुल बाजूला ठेवून ‘महाडिक’ म्हणून केल्याने त्याला महत्व आहे. त्याचवेळी आमदार डॉ.निलेश राणे यांनी सन 2019चे शिराळ्याचे आमदार सम्राट असतील, असे सांगून बळ दिले. त्यामुळे महाडिक वादळ शिराळ्यात घुसणार यात तिळमात्र शंका राहिलेली नाही. पुलाखालून अजून बरेच पाणी जाणार आहे. पण शिराळ्यातील सर्वच पक्षांच्या प्रस्थापितांसमोर हे वादळ थोपवण्याचे आव्हान आहे.

दहिहंडीतून राजकीय शक्तीप्रदर्शन

गेल्या काही वर्षापासून बहुतांशी पक्ष संघटना दहीहंडी उत्सावातून राजकीय शक्तीप्रदर्शन करीत आहेत. पाठीमागील काळात शक्तीप्रदर्शनाचे मुळ केंद्र इस्लामपूर हे होते. महाडीक युवा शक्तीने या उत्सवाला सुरुवात करुन अमाप प्रतिसाद मिळवला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जयंत दहीहंडी उत्सव सुरु केला. सन 2019ची निवडणूक डोळयासमोर ठेवून इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील हे शक्तीप्रदर्शनाचे केंद्र आष्टा, तर शिराळा विधानसभा मतदार संघाचे केंद्र शिराळा बनले आहे. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील समर्थक व जयंत पाटील समर्थकांनी आष्टयात या उत्सवाचे आयोजन केले. तर महाडीक युवाशक्तीने हा उत्सव शिराळयात साजरा करुन मोठा प्रतिसाद मिळवला.