|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सरपंचपदाच्या तुल्यबळ लढतीत हेमलता गायकवाडांची सरशी

सरपंचपदाच्या तुल्यबळ लढतीत हेमलता गायकवाडांची सरशी 

प्रतिनिधी/ वाई

पसरणी (ता. वाई) येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत नवतरुण विकास आघाडी, व पसरणी विकास आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत होवून एक मतांनी पसरणी विकास आघाडीच्या हेमलता गायकवाड यांनी बाजी मारून वीस वर्षे सत्तेच्या राजकारणात असलेल्या धनशक्ती असलेल्या आघाडीवर मात देत विजय मिळविला.

याप्रसंगी सदस्य कविता मांढरे, नीता जमदाडे, मधुकर कोचळे, हरीभाऊ सुतार, प्रवीण दाहोत्रे, दीपक सणस यांची प्रमुख उपस्थिती होती. पसरणी गाव हे वाई तालुक्यातील राजकारणात आघाडीवर असणारे गाव असून या गावात नेहमी दीर्घकाळ राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस याची सत्ता होती, परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पसरणी गावातील सर्वसामान्य जनता व तरुण वर्ग यांनी पसरणी विकास आघाडी स्थापन करून प्रस्थापितांना शह दिला. त्यावेळी या पसरणी विकास आघाडीने ‘काटे की टक्कर’ दिली. त्यावेळी काही उमेदवारांचा निसटता पराभव झाला. त्यावेळी ग्रामपंचायतीत नवतरुण विकास आघाडीचे दहा सदस्य, तर पसरणी विकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. तेरा सदस्य असणाऱया बलाढय़ ग्रामपंचायतीत नवतरुण विकास आघाडीचा सरपंच झाला.

गावातील पसरणी विकास आघाडी कोणत्याही पक्षांची नसून तरुणांची व सर्व सामान्य जनतेची व पुरोगामी विचारांची स्थापन करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत नवतरुण विकास आघाडीचा कारभार समाजाभिमुख न झाल्याने त्यांच्या गोटातील अनेक जण नाराज झाले होते. याच गोष्टीचा फायदा घेत पसरणी विकास आघाडीने नाराजांना आपल्या गोठात सामील करून घेवून विरोधकांचे चार उमेदवार फोडण्यात यश मिळवीत काल झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पसरणी विकास आघाडीचा सरपंच करून मात दिली आहे. या गावतील मतदारांनी दोन वेळा हेमलता गायकवाड यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आहे. पसरणी गावाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने एका सर्वसामान्य समाजातील महिलेला सरपंचपदी निवडून देणे म्हणजे खऱया अर्थाने पुरोगामी विचारांची पाठराखण केल्याचे हे एक अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. या निवडणुकीसाठी गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts: