|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा दावा

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा दावा 

प्रतिनिधी/ मडगाव

राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदी करण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या निविदा न काढता 36 राफेल लढावू जेट विमान खरेदी केल्याने सुमारे 41.205 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला असून या प्रकरणी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षातर्फे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांना शुक्रवारी सादर करण्यात आले.

राफेल विमान खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याने, काँग्रेस पक्षाने निदर्शने केली. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवून आणले. मडगावच्या एसजीपीडीए मार्केट संकुलाजवळ कार्यकर्ते एकत्र आले व नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे प्रभारी चेल्लाकुमार, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत, आमदार रवी नाईक, आमदार क्लाफास डायस, आमदार विल्प्रेड डिसा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस, दक्षिण गोवा जिल्हा महिला अध्यक्ष सावित्री कवळेकर, संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर इत्यादी नेते व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

12 डिसेंबर 2012 साली केंद्रात युपीए-काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना आंतरराष्ट्रीय निविदा खुल्या केल्या होत्या. त्यात 526.10 कोटी म्हणजेच 18.940 कोटी 36 विमानाच्या खरेदीसाठी मोजावे लागले असते. या आंतरराष्ट्रीय निविदा रद्य करण्याच्या ऐवजी केंद्रातील मोदी सरकारने 36 लढावू विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव पुढे नेला. प्रत्येक विमानामागे त्यासाठी 1670.70 कोटी मोजावे लागले. हा आर्थिक घोटाळा असून या प्रश्नावर दर वेळी सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने निवेदनातून केला आहे.

संरक्षण खरेदी प्रक्रियचे मोदी सरकारने उल्लंघन केले आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान खरेदीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता देखील घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री जनतेची दिशाभूल करतीत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचल्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले. नंतर विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांची राफेल विमान खरेदीत झालेल्या घोटाळय़ावर भाषणे झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राफेल विमान खरेदी घोटाळय़ाचा मुद्दा जरी काँग्रेस पक्षाने पुढे केला तरी काँग्रेस पक्ष दक्षिण गोव्यात भक्कम असल्याचे भासविण्यासाठी हा प्रयत्न होता हे शक्ती प्रदर्शनावरून स्पष्ट झाले. त्यात काँग्रेसचे काही आमदार फुटून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचा मध्यतरी उधाण आले होते. त्याला ही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसने शुक्रवारी केला.

Related posts: