|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीच्या ट्रॉलर्सकडून नेरुल भागात मासेमारी

पणजीच्या ट्रॉलर्सकडून नेरुल भागात मासेमारी 

प्रतिनिधी/ म्हापसा

पणजीतील मच्छीमार बूस्ट ट्रॉलीद्वारे नेरुल किनाऱयावर आठ मीटर अंतरात मासेमारी करीत असल्याने त्याचा फटका स्थानिक मच्छीमाऱयांना बसत आहे. सर्व मासे ते घेऊन गेल्यावर आमच्या बोटी मासे नसल्याने रिकाम्या परत येतात. सध्या फार्मोलिनमुळे बार्देशमध्ये ताजे मासेच विकल्या जातात मात्र पणजीतील ट्रॉलरवाले येथील मासे पकडून बाहेर पाठवत असल्याने गोवेकरांना फार्मोलिन मासे खावे लागतील अशी भीती व्यक्त करुन पणजीतील ट्रॉलर्सवर कारवाई करण्याची मागणी नेरुल येथील नागरिकांनी मच्छीमार खात्याचे संचालक विनेश आर्लेकर यांच्याकडे करुन त्यांना धारेवर धरले.

ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर यांच्या सहकार्याने नेरुल भागात राहाणाऱया मच्छीमार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छीमार खात्याच्या अधिकाऱयांना नेरुल पंचायत सभागृहात बोलाविण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री जयेश साळगावकर, सरपंच पियादाद आल्मेदा, उपसरपंच संदीप भोसले, पंच आंतोन फर्नांडिस, अभिजित बाणावलीकर, अविनाश शिरोडकर, पंच शशिकला गोवेकर, मच्छीमार खात्याचे संचालक विनेश आर्लेकर, अधीक्षक चंद्रेश हळदणकर, सर्वेक्षण अधिकारी जान्हवी रेडकर उपस्थित होते.

पाण्यात उतरणाऱया टॉलर्सची नोंदणी नाही

ट्रॉलर्स आठ मीटरपर्यंत जवळ येऊन मासेमारी करतात मात्र यांची साधी नोंदही झालेली नसते. याकडे खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पीक सीझनमध्ये कर्ज देण्यात येईल असे मच्छीमाऱयांना सांगितले जाते मात्र सप्टेंबर संपला तरी कर्ज वितरण नाही. मोरजीतील मच्छीमाऱयांना सर्व सुविधा त्वरित मिळतात मग आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करुन बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी मच्छीमाऱयांनी केली.

स्वागत सरपंच पियादाद यांनी केले. पंच आंतोन फर्नांडिस, अविनाश शिरोडकर यांनी आपले विचार मांडले. खात्याचे अधिक्षक चंद्रेश हळदोणकर यांनी खात्यातर्फे मिळणाऱया विविध योजनांची माहिती दिली.

कायदा मोडणाऱयावर कारवाई करु : संचालक आर्लेकर

मच्छीमार खात्याचे संचालक विनेश आर्लेकर म्हणाले की, पेट्रोलिंग पथकाला नेरुल भागात पाठवून तपासणी करण्यात येईल. यापूर्वीही येथे येणाऱया ट्रॉलर्सवर कारवाई केलेली आहे. मात्र आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. मच्छीमाऱयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य करु, असे आश्वासन त्यांनी दिले. नेरुलमध्ये तीन संघटना आहेत मात्र आजवरु कुणीही योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे न आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

नागरिकांच्या सर्व समस्या सोडविणार : मंत्री साळगावकर

मंत्री जयेश साळगावकर म्हणाले की, मच्छीमाऱयांच्या समस्या, त्यांचा अधिकाऱयांशी थेट संवाद व्हावा या हेतूने ही बैठक बोलाविली होती. त्यानुसार मच्छीमाऱयांनी आपल्या समस्या अधिकाऱयांकडे मांडल्या आहेत. मच्छीमारमंत्री विनोद पालयेकर यांच्यापर्यंत समस्या नेऊन त्यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. गावातील सर्व समस्या सोडविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

Related posts: