|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चतुर्थीमुळे काँग्रेसचा गोवा बंदला नकार

चतुर्थीमुळे काँग्रेसचा गोवा बंदला नकार 

प्रतिनिधी/ पणजी

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे देशभरात सोमवारी बंद पुकारण्यात आला असला तरी गोवा काँग्रेसतर्फे गोव्यात बंद पाळला जाणार नाही. गणेश चतुर्थी तोंडावर आली असल्याने गोव्यात बंद पाळून लोकांची गैरसोय करायची नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय भिके यांनी ही माहिती दिली.

पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने त्याचा निषेध म्हणून काँग्रेसने सोमवार 10 रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. गोव्यात सध्या चतुर्थीची तयारी जोरात असून लोक साहित्य खरेदी व अन्य कामामध्ये व्यस्त आहेत. अशावेळी गोव्यात बंद पाळून वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण केल्यास त्याचा परिणाम जनतेवर होणार आहे. त्यामुळे गोवा काँग्रेसने गोव्यात बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राज्यातील प्रमुख पेट्रोल पंपवर पत्रके वाटून लोकांमध्ये पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीबाबत जागृती केली जाणार आहे. 2014 मध्ये पेट्रोलचे दर किती होते व आज 2018 मध्ये पेट्रोलचे दर काय आहेत याची माहिती लोकांना दिली जाणार आहे.

2014 मध्ये पेट्रोलचे दर किती होते आणि आज किती झाले यावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. 2014 मध्ये पेट्रोलचे दर 54.78 रुपये प्रतिलिटर होते. तर आज 74.78 रुपये प्रतिलिटर एवढा पेट्रोलचा दर आहे. 2014 मध्ये प्रुड तेलाचे दर 134 डॉलर प्रति बॅरल होते. तर आज 66.80 डॉलर प्रति बॅरल आहे. 2014 मध्ये प्रुड तेलाचे दर प्रचंड वाढलेले असताना काँग्रेस सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवले आणि आज प्रुड तेलाचे दर प्रचंड खाली आले असताना पेट्रोलचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. महागाईच्या बाबतीत भाजप सरकारने जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

गोवा सरकारने व्हॅट रद्द करावा

गोव्यातही पेट्रोलचे दर बरेच वाढले असून गोवा सरकारने पेट्रोलवरील व्हॅट रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गोव्याचे प्रशासन ठप्प झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री अमेरिकेला जात असल्याने सध्या प्रशासनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. प्रशासन ठप्प झाले आहे असा आरोपही त्यांनी केला.