|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उगारखुर्द येथे महिलेचे मंगळसूत्र लांबविले

उगारखुर्द येथे महिलेचे मंगळसूत्र लांबविले 

वार्ताहर /उगार खुर्द

गणपतीची वर्गणी मागण्याचे निमित्त करून दोघा भामटय़ांनी महिलेच्या गळ्य़ातील मंगळसूत्र हिसकावून लांबविल्याची घटना येथील कुडची मार्गावरील दत्त मंदिर नजीक शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. प्रियांका चिदानंद हडपद असे मंगळसुत्र लंपास झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, प्रियांका या घरी एकटय़ाच असल्याचे पाहून सकाळी 9.30 वाजता दोन तरुणांनी घरचा गेट व दरवाजा उघडला. त्यानंतर ते दोघे घराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले व गणपती उत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. घरी कोणी नाही, याचा काणोसा घेत त्यांनी प्रियांका यांच्या गळ्य़ातील अर्धा तोळ्य़ाचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर हातातील अंगठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियांका यांनी हात घट्ट धरल्याने भामटय़ांना अंगठी काढता आली नाही. त्यामुळे भामटय़ांनी महिलेस ढकलून दिले. यानंतर सदर दोघांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी सदर भामटय़ांनी दुचाकीवरुन पलायन केले. सदर दुचाकीला नंबरप्लेट नव्हता.

 सदर महिला गरोदर असल्याने ढकलल्यानंतर त्या खाली कोसळल्या. यावेळी त्यांना दुखापत झाल्याने असह्य़ वेदना होत होत्या. यावेळी त्यांना आरडोओरडही करता आली नाही. काहीवेळाने हा प्रकार निदर्शनास आला. परिणामी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गणेशोत्सव काळात बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Related posts: