|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणरायाचे स्वागत खड्डय़ातूनच होणार का?

गणरायाचे स्वागत खड्डय़ातूनच होणार का? 

अनेक ठिकाणच्या खडय़ामुळे नागरिक त्रस्त

वार्ताहर/   एकसंबा

चिकोडी तालुक्याला जोडणाऱया मुख्य रस्त्यासह एकसंबा गावातील विविध अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी व नगरपंचायत या खडय़ांची डागडुजी करणार का? असा प्रश्न गणेश भक्तांसमोर पडला आहे. एकसंबा गावच्या प्रवेशद्वारावरच मोठय़ा प्रमाणात खड्डे असल्याने खडय़ातून प्रवाशांचे स्वागत होत आहे. तर गल्लोगल्ली बसविलेल्या पेव्हर ब्लॉकचीही अवस्था अशीच आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव खड्डेमुक्त व्हावा अशी अपेक्षा गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.

मध्यंतरी झालेल्या संततधार पावसामुळे निकृष्ट कामांचे पितळ उघडे पडले आहे. गावातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत. पावसाळय़ात खडय़ांमध्ये भरपूर पाणी साचल्याने रस्त्याची कामे होत नाहीत हे सर्वांना माहीत आहे. पण काही दिवसावर गणेशोत्सव असल्याने गणेशोत्सवात तरी खड्डेमुक्त रस्ता करावा अशी अपेक्षा गणेश भक्तांकडून व्यक्त होत आहे. जून महिन्यांपासून एकसंबा व्याप्तीतील रस्त्यांची दैना उडाली आहे. गावातल्या गावात फिरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

खड्डेच खड्डे चोहीकडे

चिकोडी तालुका शहरापासून 11 कि.मी. अंतरावर एकसंबा हे राजकीय नेत्यांचे गाव आहे. एक खासदार तर दोन आमदार अशी या गावची ख्याती आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या गावातील नागरिकांना खड्डे अक्षरश: त्रासदायक ठरले आहेत. शिवयोगी मठ हे एकसंबा गावचे प्रवेशद्वार आहे. पण प्रवेशद्वारापासूनच खड्डय़ांचा सामना करावा लागत आहे. तेथून 1 कि.मी. अंतरापर्यंत बऱयाच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच महादेव मंदिर ते मराठी शाळा, मुलींच्या कन्नड शाळेसमोर तर भगदाड पडल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांची झालेली दैना पाहता खड्डेच खड्डे चोहीकडे अशी स्थिती झाली आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष

खड्डेमुक्त मतदारसंघ करण्याचे आश्वासन प्रत्येक लोकप्रतिनिधी देतात. त्या प्रमाणे कोटय़वधींचे रस्ते तयार होतात. कंत्राटदाराला काम दिले की रस्ता पूर्ण झाल्याची भावना लोकप्रतिनिधींमध्ये असते. पण त्या कामाची गुणवत्ता मात्र तपासली जात नाही. यामुळे रस्ता झाल्यानंतर काही महिन्याच्या कालावधीतच रस्ते खड्डेयुक्त होऊ लागतात. खड्डा पडला की बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची व बांधकाम विभागाची असते. पण संबंधितांच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची झालेली अवस्था व लोकांना झालेला त्रास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेव्हर ब्लॉक बनली डोकेदुखी

एकसंबा शहरात भुयारी मार्गाद्वारे विद्युत पुरवठा करण्यासाठी खासदार व आमदार हुक्केरी यांच्या प्रयत्नातून सदर काम हाती घेण्यात आले. यासाठी 2 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर झाला. गावातील घराघराला भुयारी मार्गाद्वारे विद्युत पुरवठा झाला. पण त्यासाठी मोठय़ा प्रमाणात खोदकामही करण्यात आले. प्रमुख मार्ग वगळता गल्ली बोळात या कामासाठी काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे गल्लीतील नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. पेव्हर ब्लॉक न बसविल्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी झाली आहे. वाहन चालविण्यास मोठी कसरत करावी लागत असल्याने यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

चौकट करणे

मोठे मुरुम अपघातास कारण

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी मोठय़ा मुरुमाचा वापर करण्यात आला. खडय़ांमध्ये मुरुम टाकले पण त्यातील मुरुमाची खडी मोठी असल्याने ती अपघातास कारणच ठरली आहे. मरुम टाकूनही त्यावरुन वाहने जाऊन त्याठिकाणी पुन्हा खड्डाच निर्माण झाला आहे. ही स्थिती गणेशोत्सवापर्यंत अशीच राहिल्यास यंदाचा गणेशोत्सव खडय़ातून साजरा करावा लागणार आहे. शेतात राहणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. तेथील नागरिक गणपती घरी घेऊन जाण्यास दुचाकीचा उपयोग करतात. पण रस्त्यावरील खड्डे पाहता गणेशभक्तांना गणपती घेऊन जाण्यास तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की.