|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलिसांकडून मंडळांना बॉण्डची सक्ती नाही

पोलिसांकडून मंडळांना बॉण्डची सक्ती नाही 

पोलीस आयुक्तांची महामंडळाला ग्वाही

बेळगाव/ प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेताना वीस रुपयांचा बॉण्ड व मंडाळाच्या पदाधिकाऱयांचे फोटो घेण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या जाचक अटी दूर कराव्यात, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांना करण्यात आली होती. आयुक्तांनी बॉण्ड व फोटोची सक्ती करणार नसल्याची ग्वाही महामंडळाला दिली आहे.

बेळगाव शहरात मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढून ती 370 वर पोहोचली आहे. या मंडळांना परवानगी देताना वीस रुपयांचा बॉण्ड व पदाधिकाऱयांचे फोटो बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांमधून नाराजी व्यक्त होत होती. धार्मिक सण साजरे करतानाही अशा प्रकारे जाचक अटी लादण्यात आल्याने काही मंडळांनी बॉण्ड देणे टाळले होते.

या जाचक अटींची तक्रार मंडळांनी महामंडळाकडे केली होती. महामंडळाने शनिवारी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली. आयुक्तांनी महामंडळ जबाबदारी घेत असल्यास ही अट मागे घेऊ असे सांगितले. महामंडळाने जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याने अखेर आयुक्तांनी ही सक्ती संबंधित पोलीस स्थानकांना सांगून मागे घेतली.

यावेळी महामंडळाचे सरचिटणीस शिवराज पाटील, सागर पाटील, शहापूर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, अशोक चिंडक, गणेश दड्डीकर, बाळासाहेब काकतकर, राजेंद्र हंडे, शेखर हंडे, अनंत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने जाचक अटी मागे घ्याव्यात

बेळगावचा गणेशोत्सव हा भव्यदिव्य स्वरुपाचा असतो. परंतु प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळांवर जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. प्रशासनाने एक खिडकी व्यवस्था करूनही ती कुचकामी ठरत आहे. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही प्रक्रिया सुलभ करावी, अशी माहिती लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातचे अध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकार परिषेदत दिली. 

 

Related posts: