|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता बसवेश्वर उड्डाणपुलाच्या पूर्णत्त्वाचे वेध

आता बसवेश्वर उड्डाणपुलाच्या पूर्णत्त्वाचे वेध 

प्रतिनिधी/ बेळगाव

महनीय व्यक्तिंच्या दौऱयांसाठी रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा लाभला आहे. त्या पाठोपाठ आता दिवसेंदिवस लांबणीवर पडत चाललेल्या बसवेश्वर उड्डाणपुलाच्याही कामाची पूर्तता करवून घेण्याबाबत जाग आली आहे. खासदार सुरेश अंगडी यांनी शनिवारी या पुलाच्या कामाची पाहणी करून दि. 31 ऑक्टोबरपर्यंत पूल खुला करण्याविषयी सूचना केली.

शहरातील महत्त्वाच्या अशा या उड्डाणपूल निर्मितीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे येथील नियमित होणारी रहदारी अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. अशातच काँग्रेस रोड हा मुख्य रस्ता खड्डय़ांनी भरून गेला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दि. 15 रोजी बेळगावात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय ठरू शकणारा बसवेश्वर उड्डाणपूलदेखील नियोजित कालावधीत पूर्ण करून घेण्याचा साक्षात्कार खासदारांना झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

शहर आणि उपनगरांना जोडणारा हा पूल लवकर बांधून पूर्ण होईल अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. पावसाच्या सततच्या माऱयामुळे सदर काम रखडले आहे. त्यामुळे कामास विलंब लागल्याचे स्पष्टीकरण रेल्वेच्या अभियंत्यांकडून देण्यात आले. सदर कामाची पूर्तता योग्य वेळेत व्हावी यासाठी आता कामाची गती वाढवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या पाहणीच्या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजीद शेख, मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आदी उपस्थित होते. 

Related posts: