|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » गाव गाता गजाली पुन्हा येणार

गाव गाता गजाली पुन्हा येणार 

गाव गाता गजालीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे.

मॅड झालंस काय, व्हतला व्हतला सगळा व्हतला आणि मी कधी कुणाक काय सांगतंय काय हे संवाद लवकरच रसिकांच्या कानावर पडणार आहेत. कारण संदीप, वामन्या, आबा, क्रिश ही पात्र नव्या रूपात तुमच्या भेटीला येणार आहेत. गाव गाता गजालीच्या चाहत्यांसाठी आता खूशखबर आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्यात चित्रित झालेली आणि कोकणच्या मातीचा सुगंध असलेली गाव गाता गजाली ही मालिका लवकरच झी मराठीवर कमबॅक करणार आहे. मालिका संपतानाच लवकरच आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येऊ, असे आश्वासन दिलं होतं. अखेर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आश्वासन पूर्ण केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे. या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण कोकणातच करण्यात आले आहे.

या गजालींमध्ये नावीन्य असेल आणि कोकणातील गावाकडची माणसे पुन्हा एकदा बघायला मिळतील. नव्या कथा प्रेक्षकांना पाहता येतील. यावेळी लेखकांच्या टीममध्ये नवे लेखक असणार आहेत. प्रभाकर भोगले, अंबर हडप आणि ओंकार दीक्षित यांच्यासोबत कोकणातील इतर काही स्थानिक लेखकही लेखन करणार आहेत, असे या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी सांगितले. याविषयी झी मराठीचे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर म्हणाले की, गाव गाता गजाली मालिका प्रेक्षकांची आवडती होती. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ती पुन्हा सुरू करत आहोत.