|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अंतरंगात संयोग बहिरंगात वियोग

अंतरंगात संयोग बहिरंगात वियोग 

गोपी म्हणतात-कन्हैया! तुझे इतर भक्त काही ना काही साधना करीतच असतील. ते तर योगी, ज्ञानी, कर्मनि÷ असतील. त्यांना तर कोणत्या ना कोणत्या साधनाचा आधार असेलच आणि आम्ही तर निराधार आहोत. आम्ही तर तुझ्या एकटय़ाच्याच आश्रयावर आहोत. आम्ही तर गावातील न शिकलेल्या गोपी आहोत. तूच आमचा एकमेव आधार आहेस. (जीव निराधार होणे पसंत करतो म्हणून भगवंत त्याला मिळत नाहीत. गोपी तर ध्यानादि सर्व काही करीत राहूनही समजतात कीं त्या काहीच करू शकत नाहीत. असा भाव ठेवणाराच व्रजभक्त आहे.) कन्हैया! आम्हाला तर हें देखील माहीत नाही की तुझे ध्यान कसे करावे. आम्ही गावंढळ, न शिकलेल्या अबला तुला शरण आलो आहोत. तुझ्यावर पहिला अधिकार आमचा आहे. (सर्व प्रकारची साधना केल्यानंतर सुद्धा ज्याला साधनेचा अभिमान नाही तोच नि:साधन भक्त. सत्कर्म आणि साधनेने अभिमान वाढतो. म्हणून सत्कर्म आणि साधनेच्या पूर्णाहूतीच्या वेळी-मंत्रहीनं क्रियाहीनं-हा मंत्र म्हटला जातो. साधना करा, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे की हृदयाने नम्र व्हा. उद्धट जीव कृष्णाला पसंत नाही. मी तर निरभिमानी आहे असे समजणे आणि म्हणणें सुद्धा अभिमानच आहे. जेव्हा हृदय नम्र होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी देवाचें दर्शन होत असते.) गोपी -तुझा अवतार व्रजभक्तांसाठीच आहे. म्हणून तुझें परमसुंदर सावळे मुखकमळ आम्हाला दाखव. कृष्ण-माझ्या दर्शनानंतर तुमची कोणती इच्छा शिल्लक राहिल? (अंतरंगातील संयोग आणि बहिरंगातील वियोगाचे हे वर्णन आहे. म्हणून श्रीकृष्ण प्रत्यक्ष संभाषण करीत आहेत असा भास होत आहे.) गोपी-हे कामविनाशका! आमच्या सर्वच कामना तू नष्ट करू शकतोस. आमच्या कामाचा नाश कर. गोपी कामसुखाची नाही, तर कामनाशाची इच्छा करीत आहेत. संत आणि गुरुंच्या हातात कामनाशाची शक्ती असते. तुकाराम महाराज तर म्हणतात-

संत चरणरज लागता सहज । वासनेचें बीज जळोनि जाय ।।

गोपी-आपला हात आमच्या मस्तकावर ठेवताक्षणीच आमच्या बुद्धीतील कामवासना नष्ट होऊन जाईल. आपले चरण आमच्या हृदय आणि मस्तकावर ठेवा. कृष्ण-माझें चरण काय इतके सुलभ आहेत कीं वाटेल त्याच्या हृदयावर ठेवू? गोपी-तुझे चरण तर तृणचरानुग आहेत. वृंदावनातील तृणाला ते सुलभ आहेत. गाईंच्यासाठी तुझे चरण सुलभ आहेत. कारण कीं तुम्ही दोघे एक दुसऱयाच्या आगेमागे चालत असता. तुझे चरण गाईंसाठी सुलभ आहेत तर मग आम्हाला का लाभ मिळू शकणार नाही? आम्ही तर गाईंपेक्षा सुद्धा दीन होऊन आलेल्या आहोत. कृष्ण- मला तुम्ही गोपाळ समजता काय? गोपी-नाही! नाही! तुम्ही तर श्रीनिकेतन आहात. तुमचे चरण तर लक्ष्मीचें निवासस्थानरूप आहेत. तुमचे चरण तर लक्ष्मी नेहमी आपल्या मांडीवर ठेवून सेवा करीत असते.