|Monday, April 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नो पार्किंग

नो पार्किंग 

आमचा मित्र नागजंपी ऊर्फ नाग्या एक सॉलीड डोकेबाज इसम आहे. कोणत्याही समस्येवर अफलातून तोडगा काढतो. परवा त्यानं जी धमाल केली तिला तोड नाही.

शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अनेक मोठय़ा रस्त्यांवरचे पदपथ माननीय आयुक्तांनी वरकरणी पादचाऱयांसाठी रुंद केले आहेत. वाहनचालकांसाठी असलेला रस्त्याचा भाग अरुंद झाला आहे. त्यामुळे धनदांडगे वाहनचालक रडकुंडीला येतात.

पण मध्यमवर्गीय पादचारी खुष असतात. शिवाय रुंद झालेल्या पदपथांवर नव्याने दाखल झालेले गोरगरीब अनधिकृत फेरीवाले खुष असतात. अशा रीतीने माननीय आयुक्तांनी रस्त्यावर समाजवाद आणला आहे. शहरातल्या उरलेल्या रस्त्यांवर मेट्रोचे काम चालू असल्याने तिथेही चोवीस तास वाहतुकीचा मुरंबा ऊर्फ ट्राफिक जाम असतो. या काळात छोटे छोटे विपेते रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांना जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा करीत असतात. अशा रस्त्यांवर वाहन पार्क करायला जागा मिळणे हे टीव्हीवरच्या विनोदी नटांना पुरुष वेषात बघायला मिळण्याइतके किंवा खरे बोलणारा पुढारी भेटण्याइतके दुर्लभ असते हे सांगायला नकोच.

परगावाहून एक पाहुणे आले होते. त्यांना डेक्कन जिमखान्यावर खरेदी करायची होती. खरेदीसाठी येन केन प्रकारेण एखाद्या चालकाची मर्जी संपादून रिक्षा मिळवणं आणि रिक्षात बसून जाणं शक्मय होतं. पण तसं गेलं तर खरेदी आटोपल्यावर सगळं सामान घेऊन घरी कसं येणार? येताना पुन्हा रिक्षा मिळेल अशी खात्री नव्हती. चोवीस तासात एकदा किंवा लागोपाठ दोनदा रिक्षा आणि विनम्र रिक्षाचालक मिळणे हा सुयोग लाभण्यासाठी गाठीला फार मोठं पुण्य लागतं. खरेदीसाठी स्वतःची गाडी नेली तर पार्किंग कुठं करणार? नाग्या त्यांना स्वतःच्या कारने घेऊन गेला आणि संध्याकाळी विजयी मुदेने परत आला. पार्किंगची समस्या कशी सोडवली या प्रश्नावर त्याने फिदीफिदी हसत खुलासा केला.

“मी काय केलं, पाहुण्याला घेऊन कर्वे रस्त्यावर गेलं. तिथं ट्राफिक जाममध्ये आमचं गाडी अडकलं. मग आम्ही दोघं गाडी तशीच सोडून गाडीतून उतरलं. खरेदी केलं. शेजारच्या एका हॉटेलमध्ये जेवण उरकलं आणि मग मसाला पान खात गाडीमध्ये येऊन एसी चालू करून मोबाईलवर एक सिनेमा बघितलं. हळू हळू रस्ता मोकळं झाल्यावर घरी आलं.’’

“नाग्या, तू धन्य आहेस,’’ मी उत्तरलो.

Related posts: