|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बिगूल वाजला : अमित शहाच सरसेनापती

बिगूल वाजला : अमित शहाच सरसेनापती 

भाजपाने आगामी लोकसभा आणि तोंडावर असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका विद्यमान अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवायचा निर्णय घेतला आहे. या दोन नेत्यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आगामी 5 वर्षासाठी पक्षाचे सर्वाधिकारी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यावेळीही नरेंद मोदी विरुद्ध राहुल गांधी आणि भाजपप्रणीत रालोआ विरुद्ध काँग्रेसची महाआघाडी असा सामना रंगणार आहे. भाजपाची गेले काही दिवस जी पावले पडत होती त्यावरून असा सामना आणि असा ठराव होणार हे स्पष्ट दिसत होते. पण लोकशाहीत दिसणे आणि होणे यात खूप अंतर असते. एकूणच मैदानाची रणधुमाळी,सत्तासंघर्षाची तुतारी वाजली आहे. दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक भरली होती. ही बैठक शक्तीप्रदर्शनाची आणि संकल्पाची जशी होती तसे आगामी मैदानासाठी सेनापती निश्चिती करण्याची होती. अपेक्षेप्रमाणे हे सारे झाले आहे. भाजपाने अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ज्या निवडणुका लढल्या त्यात कोणतीही कसूर न ठेवता लढा दिला आणि यश खेचून आणले. काही ठिकाणी अपेक्षित मोठे यश मिळाले नाही. पण एकेकाळी अवघ्या 2 खासदारांचा हा पक्ष वाढता-वाढता पार्लमेंट से पंचायत तक भाजप म्हणू लागला हे मोठे यश आहे. भाजपची ही कार्यकारिणी बैठक लोकसभा निवडणूकपूर्व शेवटची बैठक होती. संघटनात्मक बदल, नेमणुका, नियुक्त्या, धोरण, कार्यक्रम, रणनीती अशा अनेक पातळय़ावर निर्णय करण्यासाठी पक्षाची ही कार्यकारिणी काय पवित्रा घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. राजकीय पक्षात अंतर्गत गटबाजी असतेच. राजकीय पक्षावर बाहेरूनही काही दबाव असतात. नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी भाजपाचे राष्ट्रीय राजकारण ताब्यात घेतले तेव्हाही नवा-जुना, ज्येष्ठ-नवे असा संघर्ष दिसत होता. रालोआतही जुने-मित्र, नवे मित्र वगैरे सुरु होते. पण हे सारे प्रवाह मोडीत काढून अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी पक्षावर आणि सरकारवर आपली पकड घट्ट केली आहे आणि यशावर ते स्वार आहेत. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अमित शहांना मुदतवाढ मिळणार व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा ठराव होणार हे स्पष्ट होते. आधिवेशनात त्याप्रमाणे झाले आणि सर्वांनी काँग्रेसला व काँग्रेस मित्रांना लक्ष्य करून टीकेची झोड उठवली. शहांनी ‘अजेय्य भाजप’ अशी गर्जना केली. काँग्रेस महाआघाडी ही धूळफेक आहे. भाजप नवनिर्माणातून देश जोडतो आहे तर काँग्रेस तोडफोड करतो आहे अशा शब्दात अमित शहा, निर्मला सीतारामन वगैरेंनी हल्लाबोल केला. अलीकडेच शरद पवार, राहुल गांधी, लालू वगैरे डावे-उजवे, छोटे-मोठे पक्ष एकत्र करून भाजपाविरोधी महाआघाडी करायची व्यूहरचना करण्यात आली होती. त्यासाठीच्या बैठका झाल्या होत्या. कर्नाटकात या नव्या समीकरणानुसार प्रचार व पावले टाकत महाआघाडीने भाजपाच्या तोंडचा घास पळवला होता. हाच प्रयोग आगामी काही राज्याच्या विधानसभा व मार्च 19 मध्ये होणाऱया लोकसभेच्या निवडणुकीत करावयाचा अशा मनसुब्याने विरोधक एकवटत आहेत, तर आगामी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगण विधानसभा निवडणुका आणि मार्च 19 ची लोकसभा निवडणूक मोठय़ा शक्तीनी जिंकायची असा मनसुबा भाजपाने ठेवला आहे. लोकसभेत मोदी सरकार विरोधात दाखल करण्यात आलेला व मोदी सरकारने जिंकलेला अविश्वास ठराव आणि महाआघाडीत नेतृत्वावरून असलेला संघर्ष भाजपाच्या पथ्यावर पडताना दिसतो आहे. अमित शहा हे प्रोफेशनल पक्षाध्यक्ष आहेत. पूर्वीच्या काळी निवडणुकीपुरते राजकारण असे. अलीकडे 24 तास 365 दिवस राजकारण आणि त्यावर नजर ठेवूनच काम, निर्णय, घोषणा केल्या जातात. पक्षाची वॉर रूम, सोशल मीडिया सेल, प्रसार माध्यमात चर्चा-वाद, संघटनात्मक बांधणी, जातीय समीकरणे असे अनेक विषय सदासर्वकाळ प्राधान्य देऊन हाताळले जातात आणि भाजपा त्यात माहीर आहे. देशात सध्या आरक्षण आणि बेरोजगारी व शेती-शेतकरी दुरवस्था हे कळीचे विषय आहेत. शिक्षण हा धंदा झाला आहे आणि मोदी सरकारने पाच वर्षापूर्वी सत्तेवर येताना दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आगामी काळात सरकार काय पावले उचलते हे बघावे लागेल, पण इंधनाचे चढे दर, भडकती महागाई, वाढती बेरोजगारी व आतबट्टय़ाची शेती यामुळे समाजातील अनेक घटक अस्वस्थ आहेत. ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा असली तरी त्यांची तळागाळापर्यंत अनुभूती येत नाही. गेल्यावेळी भाजपाला लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिक जागा मिळवणार असा भाजपाचा संकल्प आहे. पण घोडामैदान दूर आहे. भाजपाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी नेमले आहेत. काहींच्या कानात तिकीट देणार तयारीला लागा असे म्हटले आहे. भाजपाच्या काळात सरकारी योजनांचा अनेक लोकांना थेट लाभ देण्यात आला आहे. मग कर्जमाफी असो उज्ज्वला गॅस योजना असो, गृहप्रकल्प असो अथवा अन्य अशा लाभार्थींची संख्या 25 कोटी असल्याचे म्हटले जाते. या लाभार्थींना मतदार बनवण्याचे लक्ष ठरवण्यात आले आहे. एक बुथ वीस यूथ हा कार्यक्रम आहेच. त्यामुळे सर्व ताकदीने भाजपा मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे. भाजपा विरोधकांनीही आता एकजूट आणि समान कार्यक्रम ठरवावा लागेल. महाआघाडीचा नेता ठरवावा लागेल. भाजपाने समान नागरी कायदा, रामजन्मभूमी याबाबत अद्याप मौन पाळले आहे. तिहेरी तलाक, समलिंगी संदर्भात निर्णय केले आहेत. मतदार हुशार आहे. मतदारांनी अनेकांना अनेकवेळा धक्का दिला. भाजपानेही ‘शायनिंग इंडिया’ घोषणा करून मैदान जिंकायचे ठरवले होते. तेव्हा तोंड फोडून घेतले होते. पण, प्रत्येक मैदानाचे भवितव्य वेगळे असते. तूर्त भाजपाने अजेय्य भारतचा नारा दिला आहे. मोठा संख्येने जनादेश राखणार असा नारा दिला आहे. संघटनात्मक निवडणुका लांबणीवर टाकून लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहानाच सरसेनापती म्हणून नियुक्त केले आहे. बिगूल वाजला असा त्याचा अर्थ आहे.