|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » काँटिनेन्टल चषक स्पर्धेत अपरिंदरला कांस्यपदक

काँटिनेन्टल चषक स्पर्धेत अपरिंदरला कांस्यपदक 

या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ऍथलेट होण्याचा बहुमान

वृत्तसंस्था/ ओस्ट्राव्हा

तिहेरी उडीचा ऍथलेट अरपिंदर सिंगने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली असून त्याने आयएएएफ कॉन्टिनेन्टल चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत कांस्य जिंकून पहिला भारतीय ऍथलेट होण्याचा बहुमान मिळविला. त्याने 16.59 मी. उडी घेत तिसरे स्थान मिळविले.

जकार्तामध्ये अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदरने सुवर्णपदक पटकावले होते. येथील उपांत्य फेरीत त्याने पहिल्या तीन प्रयत्नांत 16.59 मी. उडी घेतली. पण पुढच्या प्रयत्नात त्याला फक्त 16.33 मी. झेप घेता आली. त्यामुळे त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही. मात्र कांस्यपदकासाठी त्याची आधीची कामगिरी पुरेशी ठरली होती. 25 वषी अरपिंदर या स्पर्धेत आशिया पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. चार वर्षातून एकदा ही स्पर्धा भरविण्यात येते. अरपिंदरने जकार्तामध्ये 16.77 मी. उडी घेतली होती तर त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी 17.17 मी. ची असून 2014 मध्ये त्याने ही कामगिरी नोंदवली होती. कॉन्टिनेन्टल चषक स्पर्धेत भारताच्या एकाही खेळाडूला आजवर पदक जिंकता आलेले नव्हते. 2010 पूर्वी या स्पर्धेला आयएएएफ विश्वचषक स्पर्धा या नावाने ओळखले जात होते.

विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन व विश्व चॅम्पियन अमेरिकेच्या ख्रिस्तियन टेलरने येथील स्पर्धेत 17.59 मी.उडी घेत सुवर्ण पटकावले तर बुर्किना फासोच्या हय़ुग्युस फॅब्रिस झान्गोने 17.02 मी. उडी घेत रौप्य मिळविले. या दोघांतच अंतिम फेरी झाली. टेलर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत होता. या स्पर्धेत पुरुष व महिलांचे असे एकूण 37 क्रीडाप्रकार घेतले जात असून युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया पॅसिफिक या चार खंडातील दोन सर्वोत्तम ऍथलेट्स यात खेळण्याची संधी मिळते. यामध्ये उपांत्य फेरीत 4 खेळाडूंचा सहभाग असतो तर अंतिम फेरी दोन खेळाडूंत घेतली जाते. स्पर्धेतील चुरस वाढविण्यासाठी या वषीपासूनच ही नवी पद्धत अमलात आणली गेली आहे.