|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » नाओमी ओसाका ‘अमेरिकन चॅम्पियन’

नाओमी ओसाका ‘अमेरिकन चॅम्पियन’ 

अंतिम लढतीत सेरेना विल्यम्सवर मात, ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिलीच जापनीज खेळाडू

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

रविवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला. जपानच्या 20 वर्षीय नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावत इतिहास घडवला.  रविवारी जेतेपदाच्या लढतीत आपल्यासमोर लहानपणापासून आदर्श मानले ती सेरेना विल्यम्स आहे, याचे जराही दडपण न ठेवता ओसाकाने सरळ सेटमध्ये विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद जिंकणारी नाओमी पहिलीच जापनीज खेळाडू ठरली आहे. तसेच चीनच्या लि ना नंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी आशियाई महिला टेनिसपटू होण्याचा मान मिळवला आहे. सेरेना विल्यम्सला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  विशेष म्हणजे, जागतिक टेनिसवर अधिराज्य गाजवणाऱया सेरेना व जपानची नाओमी यांच्यात 16 वर्षाचे अंतर आहे. सहावेळ अमेरिकन ओपन चॅम्पियन व कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम जेतेपद सेरेनाच्या खात्यावर आहेत. महिलांत सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम मिळवणाऱया मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नामी संधी सेरेनासमोर रविवारी होती. मात्र, अंतिम सामन्यातील अतिआक्रमकपणा सेरेनासाठी घातक ठरला व 20 वर्षीय संयमी नाओमीने सेरेनाला नमवत किताबाला गवसणी घातली.

रविवारी न्यूयॉर्कमधील ऑर्थर ऍश स्टेडियमवर झालेल्या अमेरिकन ओपनमधील महिला एकेरीच्या वादग्रस्त अंतिम लढतीत जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सहावेळ चॅम्पियन सेरेना विल्यम्सला 6-2, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या शानदार विजयासह नाओमीने कारकिर्दीतील पहिलेवाहिले ग्रँडस्लॅम जिंकले. या विजयासह नाओमीला 3.8 मिलियन डॉलरचे बक्षीस मिळाले आहे. अर्थात, नाओमीचा यंदाच्या वर्षातील सेरेनावरील दुसरा विजय ठरला आहे. याआधी, मार्चमध्ये झालेल्या मियामी ओपनमध्ये नाओमीने सेरेनाला नमवले होते. अंतिम लढतीत सेरेनाकडून खूप चुका झाल्या, पंचावर गंभीर आरोप केल्याने या दिग्गज टेनिसपटूला पेनल्टीही देण्यात आली, याचा फटकाही तिला बसला. अर्थात, कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरलेल्या सेरेनाला अखेर उपजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शुक्रवारी नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेटला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 1 तास व 19 मिनिटे चाललेल्या या अंतिम लढतीत नाओमीने जबरदस्त वर्चस्व गाजवले. पहिला सेट नाओमीने 6-2 असा जिंकल्यानंतर दुसरा सेट मात्र चांगलाच वादग्रस्त ठरला. पहिला सेट गमावलेली सेरेना दुसऱया गेममध्ये मात्र जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होती. सामन्यादरम्यान सेरेनाचे प्रशिक्षक बाहेरुन तिला मार्गदर्शन करत आहेत हे लक्षात आल्यानंतर पंच कार्लोस रामोस यांनी नियमाचा भंग केल्याप्रकरणी सेरेनाला दंड केला. यानंतर, पुढील सेटमध्येही सेरेनाने रॅकेट जोरदार आपटल्यानंतर तिचा एक गुण कमी केला. अर्थात, सेरेनाच्या या गैरवर्तनानंतर अतिशय संयमाने खेळणाऱया नाओमीने मात्र शानदार खेळाचे प्रदर्शन करत हा सेट 6-4 असा जिंकला व जेतेपदाला गवसणी घातली.

अंतिम सामन्यात सेरेनाचा पंचावर गंभीर आरोप

गतवर्षी बाळाला जन्म दिल्यानंतर मार्चमध्ये सेरेनाने टेनिसकोर्टवर पुनरागमन केले होते. रविवारी सेरेनाची कारकिर्दीतील अमेरिकन ओपनमधील नववी तर ग्रँडस्लॅममधील 31 वी फायनल होती. याशिवाय, मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची नामी संधी तिला होती मात्र अंतिम सामन्यातील चुकामुळे तिला यश आले नाही. सेरेनाचे प्रशिक्षक सामन्यादरम्यान हस्तक्षेप करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंच रामोस यांनी सेरेनाला दंड केला होता. यानंतर, पुढील सेटमध्ये देखील सेरेनाने कोर्टवरच रॅकेट जोरदार आदळली, यामुळे पंचानी नाओमीला एक गुण दिला व तिची आघाडी 5-3 अशी झाली. यानंतर, संतापलेल्या सेरेनाने पंच रामोस यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. या साऱया प्रकारानंतर सेरेनाने एक गेम जिंकत आघाडी 5-4 अशी कमी केली. मात्र, संयमी नाओमीने शेवटचा गेम जिंकत हा सामना जिंकला. या साऱया गंभीर प्रकारानंतर सेरेनाने पंचाची सामन्यानंतर माफी मागितली.

20 वर्षीय ओसाकाचा संक्षिप्त परिचय

  1. 16 ऑक्टोबर, 1997 साली ओसाकाचा जन्म
  2. 1999 मध्ये सेरेनाने पहिले अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले, यावेळी ओसाका अवघ्या दीड वर्षाची होती.
  3. लहानपणापासून नाओमीची सेरेना विल्यम्स आयडॉल खेळाडू, सेरेनाचा आदर्श ठेवत टेनिसमध्ये मोठी झेप.
  4. वयाच्या तिसऱया वर्षी टेनिसचे धडे गिरवण्यास प्रारंभ
  5. 2014 ऑकलंड ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
  6. एप्रिल 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पहिली ग्रॅडस्लॅम स्पर्धा
  7. एप्रिल 2016 टेनिस क्रमवारीत टॉप-100 मध्ये.
  8. मार्च 2018 मध्ये कारकिर्दीतील पहिले डब्ल्युटीए जेतेपद,
  9. सप्टेंबर 2018 पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद.

 

प्रतिक्रिया

कारकिर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद नक्कीच खास आहे. अंतिम लढतीत सेरेना विल्यम्सचे कठीण आव्हान होते, मात्र सरस खेळाच्या जोरावरच मी जेतेपदाला गवसणी घातली. हे यश नक्कीच संस्मरणीय आहे.

                     नाओमी ओसाका, जापनीज टेनिसपटू

अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्याबद्दल ओसाकाचे आभार. या लढतीत तिने नक्कीच सरस खेळ केला. माझ्याकडून दुसऱया सेटमध्ये ज्या चुका झाल्या, त्याचा फटका मला बसला. याशिवाय, विक्रमी ग्रँडस्लॅमपासून वंचित रहावे लागले. पुढील स्पर्धेत नक्कीच जोमाने पुनरागमन करेन.

                               सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू