|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड 60 धावांनी आघाडीवर

इंग्लंड 60 धावांनी आघाडीवर 

जडेजाचे झुंजार अर्धशतक, विहारीचे पहिले अर्धशतक

वृत्तसंस्था/ लंडन

पाचव्या व अखेरच्या कसोटीच्या तिसऱया दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडने भारतावरील आघाडी 60 धावांपर्यंत वाढविली होती. त्याआधी भारताचा पहिला डाव 292 धावांत आटोपला. हनुमा विहारीचे पहिले अर्धशतक व रवींद्र जडेजाने झुंजार नाबाद अर्धशतक यांच्या खेळीमुळेच भारताला तीनशेच्या जवळपास टप्पा गाठता आला. जडेजाने शानदार प्रदर्शन करीत तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन नाबाद 86 धावा काढल्या.

चहापानास खेळ थांबला तेव्हा कसोटी कारकिर्दीतील शेवटचा डाव खेळणारा ऍलेस्टर कूक 13 व त्याचा सहकारी जेनिंग्स 7 धावांवर खेळत होते. इsग्लंडने यावेळी बिनबाद 20 धावा जमविल्या होत्या. त्याआधी भारताने 6 बाद 174 धावांवरून तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि ऍडरसन व ब्रॉड यांचा प्रारंभीच्या तिखट माऱयाचा समर्थपणे मुकाबला करीत हनुमा विहारी व जडेजा यांनी सातव्या गडय़ासाठी 77 धावांची भागीदारी करून भारताच्या डावाला थोडाफार आकार दिला. पहिल्या दोन तासात त्यांनी 66 धावांची भर घातली होती. विहारी सावध खेळत होता तर जडेजाने स्थिरावल्यावर काही आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली होती. विहारीने कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकवताना 124 चेंडूत 7 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 56 धावा काढल्या. त्याने 104 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. उपाहारावेळी भारताने 7 बाद 240 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतरच्या सत्रात जडेजाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जास्तीत जास्त डाव लांबविण्याचा प्रयत्न केला. पण उपाहारानंतर चौथ्याच षटकात इशांत (4) बाद झाला. मोईन अलीने हा बळी मिळविला. दुसऱया बाजूने आदिल रशिदने शमीला नवव्या गडय़ाच्या रूपात 1 धावेवर बाद केले. त्याने जडेजाला साथ देण्याऐवजी आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी आलेल्या बुमराहने जडेजाला चांगली साथ दिली. जडेजानेही त्याला चांगल्या प्रकारे शील्ड करीत संघाला तीनेशच्या जवळ आणून ठेवले. पण 95 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेत स्ट्राईक आपल्याकडेच ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र 14 चेंडू खेळून काढलेल्या बुमराहला ब्रॉड-बेअरस्टो यांनी त्याला धावचीत करून भारताचा डाव 292 धावांवर संपुष्टात आणल्याने त्यांना 40 धावांची आघाडी मिळाली होती. जडेजाने दहाव्या गडय़ासाठी बुमराहसमेवत 32 धावांची भर घालताना नाबाद 86 धावा काढल्या. त्याने नववे कसोटी अर्धशतक 113 चेंडूत पूर्ण केले तर एकंदर खेळीत त्याने 156 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार मारला. भारताने 84 व्या षटकांत 250 धावांचा टप्पा गाठला होता. शेवटचा गडी लवकर बाद होत नाही असे पाहून इंग्लंड संघ हताश झाला होता आणि शेवटचा उपाय म्हणून त्यांनी नवा चेंडू घेतला होता. पण त्याचाही त्यांना लाभ झाला नाही आणि धावचीतच्या रूपात त्यांना हा बळी मिळवावा लागला. इंग्लंडतर्फे अँडरसन, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी 2 तर ब्रॉड, करन, रशिद यांनी एकेक बळी मिळविले.

धावफलक  (चहापानापर्यंत)

इंग्लंड प.डाव 332, भारत प.डाव : राहुल त्रि.गो. करन 37 (53 चेंडूत 4 चौकार), धवन पायचीत गो. ब्रॉड 3 (6 चेंडू), पुजारा झे. बेअरस्टो गो. अँडरसन 37 (101 चेंडूत 5 चौकार), कोहली झे. रूट गो. स्टोक्स 49 (70 चेंडूत 6 चौकार), रहाणे झे. कूक गो. अँडरसन 0 (8 चेंडू), विहारी झे. बेअरस्टो गो. मोईन अली 56 (124 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), पंत झे. कूक गो. स्टोक्स 5 (8 चेंडूत 1 चौकार), जडेजा नाबाद 86 (156 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), इशांत झे. बेअरस्टो गो. मोईन 4 (25 चेंडू), शमी झे. ब्रॉड गो. रशिद 1 (5 चेंडू), बुमराह धावचीत 0 (14 चेंडू), अवांतर 14, एकूण 95 षटकांत सर्व बाद 292 धावा.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-6, 2-70, 3-101, 4-103, 5-154, 6-160, 7-237, 8-249, 9-260, 10-292.

गोलंदाजी : अँडरसन 21-7-54-2, ब्रॉड 20-6-50-1, स्टोक्स 16-2-56-2, करन 11-1-49-1, मोईन 17-3-50-2, रशिद 10-2-19-1.

इंग्लंड दु.डा 9 षटकांत बिनबाद 20 : कूक खेळत आहे 13, जेनिंग्स खेळत आहे 7.