|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाजप सरकारने जनतेचे वाटोळे लावले आहे

भाजप सरकारने जनतेचे वाटोळे लावले आहे 

महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे नेसरीतील महिला मेळाव्यात प्रतिपादन

वार्ताहर / नेसरी

आगामी काळात महिलांवर फार मोठी जबाबदारी असून खोटी आश्वासने देवून सत्तेवर आले आहेत. अच्छे दिन म्हणून सांगणाऱया मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेचे वाटोळे लावले आहे. त्यामुळे महिलांनी एकत्र येत भाजप सरकारचा खोटा बुरखा फाडण्याची गरज असून खोटी आश्वासने देणाऱया खोटारडय़ा लोकांविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी बोलताना व्यक्त केले. विठ्ठल दिप हॉल नेसरी येथे चंदगड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ बोलत होत्या.

पुढे बोलताना म्हणाल्या, मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करून, महिलांवर होणारे अत्याचार रोखून सुरक्षा देवू, खड्डे मुक्त, टोल मुक्त महाराष्ट्र, आरक्षण अशी बरीच खोटी आश्वासनं दिली होती. त्यामुळे भाजी, डाळी, सिलेंडरचे दर गगणाला भिडले असून गरिबांच्या तोंडातील गोड घास काढून घेतला असून धुरामुळे महिलांच्या डोळय़ाला इजा होवू नये म्हणून उज्ज्वला योजनेतून मोफत गॅसचे वाटप केले. मात्र सिलेंडरचे दर वाढल्याने त्याचा वापर करताना महिला आता विचार करावा लागत आहे. या सरकारला त्यांची जबाबदारी झटकता येणार नसून सरकारला जेरीला आणून त्यांना हाकलण्याची मोठी जबाबदारी आपल्या महिलांवर असल्याने होणाऱया अत्याचारा विरोधात उभ राहण गरजेच आहे. मग ती महिला कोणत्याही पक्षाची व जाती-धर्माची असली तरी चालेल ही पवार साहेबांची शिकवण असल्याचे सांगितले.

खासदार धनंजय महाडीक म्हणाले, महागाई वाढत आहे यासाठी घरच्या कर्त्या पुरूषाला हातभार लावण्यासाठी महिला सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आधार घ्या. पवार साहेबांनी महिलांना दिलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या संधीचे सोने करून घेण्याचे आवाहन केले.

आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, महिलांनी स्वतःच्या पायावर उभारून आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाले पाहिजे. सर्वांनी प्रयत्नशील राहून शासनाच्या विविध योजनेतून अर्थसहाय्य उपलब्ध करून महिलांनी एकत्रित येवून कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी. आतापर्यंत जसे सहकार्य, आशिर्वाद दिलात तसा इथून पुढच्या काळातही रहाण्याचे सांगितले.

सुरवातीस स्वागत माजी सरपंच वैशाली पाटील यांनी केले तर अनुराधा पाटील, शैलजा पाटील, संगिता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रूपा खांडेकर, मंजूषा कदम, गायत्रीदेवी कुपेकर, श्रेया कोणकेरी, विद्या पाटील, नंदिनी पाटील, सुजाता पाटील, उर्मिला जोशी, अफरीन शेख, कामीनी जाधव, बी. एन. पाटील-मुगळीकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, रामराज कुपेकर, अमर चव्हाण, संतोष पाटील, मुन्नासो नाईकवाडी, कार्तिक कोलेकर यांच्यासह चंदगड मतदार संघातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन जयसिंग चव्हाण यांनी तर आभार बनश्री चौगुले यांनी मानले.

Related posts: