|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अनिकेत कोथळे खून प्रकरणी आज सुनावणी

अनिकेत कोथळे खून प्रकरणी आज सुनावणी 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती

प्रतिनिधी/ सांगली

अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह सात आरोपींचा यामध्ये समावेश आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.

चाकूचा धाक दाखवून लुबाडणूक केल्याच्या कारणास्तव सांगली शहर पोलीसांनी अनिकेत कोथळे यास अटक करण्यात आली होती. पण, 5 नोव्हेंबर 2017 रोजी त्याचा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मृत्युदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला  होता. तर, सांगली पोलीसाकडून या प्रकरणाचा तपास काढून घेवून सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.  याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे पोलीस कर्मचारी अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे यांच्यास झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले आणि युवराज कामटे याचा मामे सासरा बाबासो कांबळे या सात जणांना अटक करण्यात आली होती. तर शासनाने या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

सीआयडीने या प्रकरणाचा तपास करून सात आरोपीच्या विरूध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पण, या आरोपीपैकी पोलीस कर्मचारी राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या दोघांनी जामिनीसाठी अर्ज दाखल होता. यावर 8 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होऊन या दोघांचाही अर्ज फेटाळण्यात आला होता.

दरम्यान, सीआयडीने या सात आरोपींच्या विरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपातील आरोपी निश्चितीसाठी सोमवारी जिल्हा न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीला सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.