|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बँकेच्या सभेत ‘शिक्षक’ एकमेकांच्या उरावर!

बँकेच्या सभेत ‘शिक्षक’ एकमेकांच्या उरावर! 

पाच मिनिटात सभा गुंडाळली : गोंधळात 13 विषय मंजूर

प्रतिनिधी/ सांगली

शिक्षक दिनाच्या सत्काराची फुले सुकायच्या आतच प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी हाणामारीची ‘फुले’ उधळली. एकमेकांचा अर्वाच्च उद्धार करत सराईत गुंडांनाही लाजवेल अशी मारामारी केली. विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी असलेले ‘शिक्षक’ मारामारीवेळी एकमेकांच्या उरावर बसले होते. बँकेच्या सभेत अनेकवेळा असे प्रसंग घडतात. पण, यावेळी गुंडागर्दीचा कळस झाला.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालक शशिकांत बजबळे यांना स्टेजवर जावून एका सभासदाने धक्काबुकी करत मारहाण केली. त्यानंतर या सभासदाला सत्ताधारी गटाच्या लोकांनी चांगलेच धुतले. त्यामुळे या सभेत फ्री स्टाईल कुस्तीच झाली. अवघ्या पाच मिनिटात ही सभा संपली. यामध्ये विषयपत्रिकेवरील 13 विषय मंजूर करण्यात आले. विरोधकांनी जाणूनबुजून दंगा करून गोंधळ केला असल्याचा आरोप सत्ताधाऱयांनी केला तर सत्ताधाऱयांनी बँकेत हुकूमशाही आणली आहे. त्यामुळे आता सभासद संचालकांच्यावरही हात उगारू लागले आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. तसेच ही सभाच झाली नाही. त्यामुळे ही सभा पुन्हा घ्या, अशी मागणी आम्ही सहकार उपनिबंधकांच्याकडे करणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे नेते विनायक शिंदे यांनी दिली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह येथे झाली. सभेची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. अध्यक्षांनी स्वागत सुरू केले. त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते विनायक शिंदे आणि अविनाश गुरव यांनी विषय पत्रिकेवरील नऊ नंबरचा विषय गाळा अशी मागणी केली. दरम्यान, ही मागणी करत असताना एक सभासद थेट व्यासपीठावर आला आणि त्याने थेट सत्ताधारी संचालक शशिकांत बजबळे यांच्या कॉलरला हात घातला. त्यांच्यावर हात उगारला. बजबळे यांनी मग त्याला ढकळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी हे दोघेही व्यासपीठावर पडले आणि एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळात फ्री स्टाईल मारामारी सुरू झाली. या सभासदाला खाली ढकलण्यात आले. दरम्यान, अध्यक्ष रमेश पाटील यांनी थेट विषयपत्रिकेला हात घातला आणि विषय क्रमांक वाचत त्यांनी या विषयाला मंजुरी घेत ही सभा पाच मिनिटातच संपविली.

  व्यासपीठावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार वादावादी आणि दंगा सुरू असताना अनेक सभासद हे खुर्चीवर उभे राहून घोषणाबाजी करत होते. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही भरणा होता. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱयांनी आम्हाला व्यासपीठावर येऊ नये म्हणून खुर्च्या बांधून ठेवल्या होत्या त्यामुळे सभासद नाराज झाले. शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळींकडून करण्यात आला त्यामुळे सामान्य सभासदही नाराज झाला आणि त्यामुळे त्यांनी आता संचालकांनाही धोपटण्यास सुरूवात केली आहे. व्यासपीठावर जोरदार दंगा सुरू असताना कोणाचे कोणाला काहीच कळत नव्हते. पण, अध्यक्ष रमेश पाटील यांनी मात्र विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक वाचून मंजूर का?  असा सवाल करत हे विषय मंजूर करून घेतले.

पाच मिनिटात सभा संपली

सभेची सुरूवात बरोबर दहा वाजता झाली. त्यानंतर अध्यक्ष रमेश पाटील स्वागताला उभा राहिले आणि लगेचच विरोधक आणि त्यांच्यात वाद सुरू झाला, तितक्यात संचालक बजबळे यांच्यावर सभासद धावून गेला त्यामुळे पहिल्या मिनिटांतच सभेत दंगा होणार हे जाणून घेतल्याने अध्यक्ष रमेश पाटील यांनी सर्व विषय या गोंधळातच मंजूर केले. आणि थेट वंदे मातरम् म्हणण्यास प्रारंभ केला. त्यानंतर ही सभा संपविली आणि अवघ्या पाच मिनिटात 13 विषय मंजूर करून ही सभा संपली.

सत्ताधाऱयांवर हुकूमशाहीचा आरोप

सत्ताधारी शिक्षक समितीने शिक्षक बँकेत हुकूमशाही आणली आहे. मनमानी कारभार त्यांच्याकडून सुरू झाला आहे. त्यामुळे सभासदांच्यात त्यांच्याबद्दल असंतोष आहे. या असंतोषामुळेच सभासदांनी त्यांच्यावर हात उगारला आहे. आता यापुढील काळात तरी सत्ताधाऱयांनी कारभार चांगला करावा आणि सभासदांना दिलासा द्यावा असे आवाहन विरोधक विनायक शिंदे, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी, हंबीरराव पवार यांनी केले.

विरोधकांनीच दंगा केला

विरोधकांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने त्यांनी या सभेत दंगा करून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ज्या सभासदांनी मारहाण केली आहे. त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. सभा शांततेत पार पाडण्याचे आम्ही आवाहन केले होते. पण विरोधकांचे नेते विनायक शिंदे यांनीच दंगा सुरू करत सभासदांना चिथावणी देत दंगा केला असल्याचा आरोप अध्यक्ष रमेश पाटील यांनी केला.