|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मानाचा गुरुवार तालिम मंडळाच्या श्रीचे वाजतगाजत आगमन

मानाचा गुरुवार तालिम मंडळाच्या श्रीचे वाजतगाजत आगमन 

आज सम्राट मंडळाचे होणार आगमन

प्रतिनिधी/ सातारा

बाप्पा दि.13 रोजी येणार आहेत. तत्पूर्वीच साताऱयातील मानाच्या गणपतींच्या मूर्तीचे आगमन होवू लागले आहे. साताऱयातील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाच्या गणपतींची मिरवणूक सोमवारी सकाळी 12 वाजता काढण्यात येणार आहे. तत्पूर्वीच मानाचा गणपती असलेल्या गुरुवार तालिम गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे आगमन रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाजतगाजत झाले. साताऱयातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या मिरवणूकीत मान्यवर सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्यात ही मिरवणूक काढण्यात आली.

 साताऱयातील मानाचा गणपती असलेल्या गुरुवार तालिम मंडळाला यावर्षी 90 वर्षे झाल्याने मंडळाने यावर्षी जल्लोषात गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सवाद्य स्वागत मिरवणूक काढण्यासाठी मुंबई येथील प्रसिद्ध लालबाग बिट्स बेजों होता. दुपारी या मिरवणूकीला गडकरआळीतून सुरुवात झाली. परंतु प्रत्यक्षात सायंकाळी गांधी मैदानावरुन या मिरवणूकीला सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. या मिरवणूकीत मंडळाचे प्रकाश गवळी, गौरव गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशीरा ही मिरवणूक मंडळाच्या मंडपाजवळ पोहचली. विधीवत पद्धतीने पुजा करत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सम्राट मंडळाचे यावर्षीचे हे 51 वे वर्ष आहे. या निमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. धर्मादाय आयुक्त सातारा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी मंडळाने दोन निराधार व गरजवंत विद्यार्थी शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतले आहेत. तसेच सोमवारी 12 वाजता श्रीमंत महागणपती सम्राट श्रींची  मिरवणूक युनियन क्लब, राजवाडा भाजी मंडई अशी काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीची सुरुवात मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात येणार आहे. पारंपारिक वाद्य तांडव ढोल हे मिरवणूकीचे आकर्षण असणार आहे, अशी माहिती सम्राट मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तांबोळी यांनी दिली.