|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कास पुष्प पठारावर पर्यटकांचा संडे ब्लॉक

कास पुष्प पठारावर पर्यटकांचा संडे ब्लॉक 

अंकुश कोकरे/ कास

सातारा शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेले कास पुष्प पठार लाल, निळय़ा, पिवळया, पांढऱया अशा विविध रंगाच्या फुलांनी बहरले आहे. काही फुले तर किटकभक्षीही आहेत. या फुलांच्या सौदर्य पाहण्यासाठी व रविवारची सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी सातारा जिह्यासह देशविदेशी पर्यटकांनी भेट दिली. जापानच्या तब्बल पंधरा पर्यटकांचे स्वागत कास वनव्यवस्थापन समितीने केले. दरम्यान, पिंपरी चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाने आपली वाहन दामटत कास पठार दाखवले. त्यास कासचा खास पठारी हिसका कास वनव्यवस्थापन समितीने दाखवत तब्बल चार हजार रुपयांचा दंड वसूल केला.

साताऱयाचे वैभव असलेले कास पुष्प पठारावरील फुलांचा बहर नुकताच सुरु झाला आहे. 25 किलोमीटरहून अधिक कार्यक्षेत्र असलेल्या या पुष्प पठारावर वन विभागाकडे ऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच पुष्प पठारावर येणाऱया वेगवेगळय़ा फुलांच्या सहवासात दिवस घालवता येतो. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच कास पुष्प पठाराकडे जाणाऱया वाहनांची गर्दी समर्थ मंदिर परिसरात वाहतूकीची कोंडी झाली होती. दरम्यान, शाहुपूरी पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली. पुढे यवतेश्वर येथे सातारा तालुका पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करुन पुढे सोडण्यात येत होते. संशयास्पद वाहनधारकांची झाडाझडती घेतली जात होती. कास पुष्प पठारावर यावर्षी ज्यादा पाऊस असल्याने हंगामाला उशीर झाला आहे. शनिवारी दीड हजार पर्यटकांनी भेट दिली तर रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अडीच हजार पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद वनविभागाकडे आहे.

 कास पुष्प पठारावर टुथ ब्रश, टीप कांडी, निमिला, रानमोहरी, वाईतुरा, सानकी, रानवांग, स्पंद, रानहळद, अबोलिया, गेंद, सीतेची आसवे, नभाळी, ड्रॉसेरा, कंदीप पुष्प यासह किटकभक्षी फुलेही असल्याने या विविध रंगी फुलांना पाहण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. विशेष करुन सीतेची आसवे, पांढरा गेंद, धनगरी फेटा, कंदील पुष्प ही फुले खास करुन पर्यटकांन भुरळ घालत आहेत.

विदेशी पर्यटकांचे स्वागत

भारतीय संस्कृतीनुसार पाहुण्याचे स्वागत करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा कास परिसरातील वनव्यवस्थापन समितीने जोपसल्याचे पाहायला मिळाले. जगाच्या नकाशावर कास पुष्प पठार ओळखले जात असल्याने जपान येथून आलेल्या 15 पर्यटकांचे स्वागत कास वनव्यवस्थापन समितीचे सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे व कार्यकर्त्यांनी केले.

भाजपा आमदारांच्या भावाला कासचा झटका

पुणे येथील पिंपरी चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्राचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ सहकुटुंबियासमवेत पुष्प पठार पाहण्यासाठी आले होते. त्यांनी आपली सातही वाहने वाहनतळावर उभी न करता थेट पुष्प पठारावर नेली. फुललेल्या फुला गाडीच्या टायराखाली घेत त्यांनी कास पुष्प पठारावरील वातावरणाचा आनंद घ्यायला सुरुवात केली. ही बाब वनव्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी लगेच त्यांना येथून वाहने वाहन तळावर न्या, अशी विनंती केली. तर त्यांनी उलट त्यांच्यावरच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना नियम दाखवताच त्यांनी नमते घेत, मीडियात बदनामी करु नका, आम्ही दंड भरतो, अशी विनंती केली. त्यांनी 35 जणांचे साडेतीन हजार आणि पाचशे रुपये दंड भरला. परंतु भाजपा आमदाराच्या भावाचा कास पठारावर नियम मोडताच त्याला कासचा पठारी हिसका लगेच दाखवुन दिला.

स्वच्छतेमध्येही कास वनव्यवस्थापनाकडून एक पाऊल पुढे

कास पुष्प पठाराची स्वच्छता राखण्यासाठी वन व्यवस्थापनाचे सुमारे दीडशे कार्यकर्ते डोळयात तेल घालून फिरत आहेत. पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्या आपल्या वाहनातच ठेवण्याची विनंती करत जर अस्वच्छता करताना आढळून आले तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना दिल्या जात होत्या. तसेच तरीही काही पर्यटकांकडून होत असलेला कचरा उचलण्यासाठी स्वच्छता दूत फिरत होते.