|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कारचा पाठलाग करून गोवा दारू जप्त

कारचा पाठलाग करून गोवा दारू जप्त 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्ग

कुडाळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटी मद्याची अवैधरितीने वाहतूक करताना इंडिका कारसह 2 लाख 88 हजार  मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 9 सप्टेंबर रोजी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क कुडाळ पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाराप येथे सापळा रचला होता. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱया पांढऱया रंगाची टाटा इंडिका कारला (एम. एच. 08-आर- 7272) तपासणीसाठी थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालक कार न थांबवता कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने घेवून गेला. या कारचा पाठलाग करून बिबवणे- नाईकवाडी येथे अडविण्यात आली. या कारची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 35 बॉक्स व कार मिळून 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवेंद्र रवींद्र शिंदे (31, रा. चिपळूण, रामपूर हायस्कूलजवळ) व रोहित आनंद माने (28, रा. कापसा, चिपळूण) यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय उपआयुक्त तथा अधीक्षक वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन. पी. रोटे, सहाय्यम दुय्यम निरीक्षक सी. डी. पवार, वाहक चालक एच. आर. वस्त, प्रसाद माळी, रमाकांत ठाकूर, शिवशंकर मुपडे, मानस पवार व अवधूत सावंत यांनी केली. याचा तपास एन. पी. रोटे करीत आहेत.