|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षक भरती करा अन्यथा तीव्र आंदोलन

शिक्षक भरती करा अन्यथा तीव्र आंदोलन 

जिल्हा डीएड बेरोजगार संघटनेचा इशारा

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

शिक्षक भरती करण्याबाबत शासन व लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे डीएड बेरोजगारांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. याची शासनाने गंभीर दखल घेलती नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डीएड बेरोजगार संघटनेच्या कोकण उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर यांनी दिला आहे.

त्या म्हणतात, गेल्या वर्षभरापासून शिक्षक भरती प्रक्रियेसाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. पण सर्व गोपनीय! पाच वर्षे पात्रता परीक्षा, नंतर अभियोग्यता परीक्षा देऊन स्वतःला ‘पात्र’ सिद्ध करून नोकरी मिळणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण परीक्षा झाली, निकाल पण लागला. पण पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार की नाही, याचीच प्रतीक्षा संपत नाही! गेली आठ वर्षे रखडलेली भरती प्रक्रिया पाहता, शासनाचे शिक्षणाबाबतचे उदासीन धोरण दिसून येते. शिक्षणमंत्र्यांनी अधिवेशनात 18 हजार शिक्षक भरती होणार, असे जाहीर केले. पण त्याला मुहूर्त कधी मिळणार हा संशोधनाचा विषय आहे! त्यातच 31 ऑगस्ट 2018 चे शासन परिपत्रकानुसार खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावे, अशी जिल्हा परिषदेकडे मागणी करून गुणवत्ताधारकांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे 26 जून 2018 च्या शासनाच्या जीआरनुसार भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’नुसार भरती करावी. भरतीचे अधिकार शासनस्तरावर होणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्हय़ांतून स्थानिक भरतीसाठी वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही ठोस माहिती न देता केवळ टोलवा-टोलवी चालली आहे. नेमक्मया किती जागांसाठी भरती होणार? ती कधी होणार? याचा कालबद्ध कार्यक्रम अजूनही निश्चित झालेला नाही. भावी शिक्षकांच्या भावनांशी खेळण्याचा डाव शासन खेळत नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया या डीएडधारकांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये गेले तीन ते चार महिने शिक्षक भरतीसाठी आंदोलन सुरू आहे पण लोकप्रतिनिधींनी आश्वासनापलिकडे काहीही केलेले नाही.  एनआयसीनुसार 50,000 पेक्षा अधिक टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 28,000 विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. 1,93,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभियोग्यता चाचणी दिली आहे, पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत आली असून अजूनही रिक्त जागांबाबत माहिती देण्यास शासन असक्षम ठरत आहे का? गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शिक्षकांच्या बहुवर्ग अध्यापनामुळे, अपुऱया शिक्षक वर्गामुळे ढासळत चाललेली गुणवत्ता पाहता, पालकांमध्येही असंतोष आहे. गावपातळीपासून सर्वजण शासनाच्या या वेळकाढू धोरणाबाबत नाराज आहेत. मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचे शासनाने त्वरित थांबवून तात्काळ शिक्षक भरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कोकण डीएड, बीएडधारक संघटनेतर्फे स्थानिक शिक्षक भरतीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ही खेदाची बाब आहे पण शासन त्याची योग्य दाखल घेत नसेल, तर यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.