|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » यंदाची गणेश चतुर्थी ‘इको – प्रेंडली’ असावी

यंदाची गणेश चतुर्थी ‘इको – प्रेंडली’ असावी 

प्रतिनिधी/ काणकोण

एकतेचे प्रतीक असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला मागच्या काही वर्षांत प्रदूषणाने विळखा घातलेला आहे. गणेशमूर्ती या मातीच्याच असाव्यात, प्लास्टर ऑफ पॅरिसला निरोप द्यावा. काणकोण पालिका क्षेत्राबरोबरच अन्य भागांतही यावेळी इको-पेंडली चतुर्थी साजरी व्हावी, असे मत काणकोणच्या नगराध्यक्षा छाया कोमरपंत यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बाजूने ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला आहे आणि दुसऱया बाजूने मात्र चतुर्थीच्या सणाच्या वेळी प्रदूषण, सर्वत्र कचरा करून सुंदर गाव प्रदूषित करण्याचे काम काही जण करतात. याला कोठे तरी आळा बसायला हवा. ज्या ठिकाणी गणपती पूजला जातो तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आहे. गणेश दर्शनाला येणाऱया लोकांची व्यवस्थित सोय करणे, मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकू नये असे सूचना फलक लावणे हे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करायला हवे, असे मत कोमरपंत यांनी व्यक्त केले.

सजावटीच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. शेवटी ती फुले नदीत सोडण्यात येतात. त्यामुळे जलप्रदूषण हात असते. प्रसादाचे वाटप देखील पानाच्या द्रोणातून व्हावे, शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा. सार्वजनिक मंडळांनी याबाबतीत सतर्क राहावे. त्याचप्रमाणे पालिकेने देखील नैतिक जबाबदारी ओळखून चतुर्थीच्या काळात या ठिकाणी कचरापेटय़ा ठेवण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थी म्हणजे निसर्गाची पूजा आहे. या उत्सवात प्लास्टिक, थर्मोकोलचा वापर करणे टाळावे. प्लास्टिकचा अतिवापर निसर्गाला हानिकारक आहे. काणकोण पालिकेने पालिकाक्षेत्र कचरामुक्त करण्याचा विडा उचलला आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सगळय़ांच्या सहकार्याची गरज आहे. गणेश चतुर्थाच्या निमित्ताने आपण सगळे जण हा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा कोमरपंत यांनी केले. मागच्या काही वर्षांपासून चावडीवर एकाच ठिकाणी माटोळीचे साहित्य विकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ते साहित्य विकून झाल्यावर सर्व जबाबदारी पालिकेवर सोडून मोकळे होतात. विक्रेत्यांनी देखील आपली थोडी शक्ती यासाठी खर्च करावी असे सूचवावेसे वाटते, असे मत कोमरपंत यांनी मांडले.

गणेशोत्सवाच्या काळात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी होत असते. विशेष म्हणजे छोटी मुले, वयोवृद्ध माणसांना फटाक्यांच्या कर्कश आवाजाने त्रास होत असतो. फटाक्यांच्या धुरामुळे आरोग्यावर परिणाम होत असतो. आतषबाजीचे साहित्य महाग असले, तरी आपले लोक त्यावर खूप खर्च करतात. आतषबाजीवर जो वारेमाप खर्च केला जातो तो टाळणे शक्य आहे. ही रक्कम समाजोपयोगी कामांसाठी खर्च करावी. प्लास्टिकमुक्त व प्रदूषणविरहीत उत्सव हा नारा जपतानाच निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याचा विडा आपण उचलूया, असे आवाहन छाया कोमरपंत यांनी केले.