|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घुमटाच्या नादाने गणेश आगमनाची चाहूल

घुमटाच्या नादाने गणेश आगमनाची चाहूल 

घुमट आरत्यांचे सराव सुरू, वातावरणात उत्साह, गणेशमूर्ती शाळांमध्ये रात्री जागताहेत

रविराज च्यारी / डिचोली

श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर गणेश चतुर्थी सणाकडे दिवस वेगाने धावत असतात. अन् याच काळात प्रत्येक गावात-शहरात वाडय़ावाडय़ावरील युवा पिढीकडून दररोज संध्याकाळी-रात्री होणारा घुमट आरत्यांचा सराव म्हणजेच गणेशाच्या आगमनाची चाहूल असते. या क्षणांमुळेच उत्सवासाठीच्या वातावरण निर्मितीत रंग भरत असतात.

सध्या गोमंतकात सर्व धर्मियांचा प्रिय असलेला सण म्हणजेच गणेश चतुर्थी या उत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. गणेशमूर्ती चित्रशाळेत कलाकार रात्रंदिवस पूर्णपणे व्यस्त आहेत. गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे. विविध कारणांमुळे सदैव चर्चेत राहणारी युवा पिढी आज आपल्या ‘बाप्पाच्या’ आगमनासाठी त्यांच्या सेवेसाठी सज्ज होताना दिसत आहे.

घुमट आरत्यांची क्रेझ आजही कायम

आपल्या गोमंतकीय परंपरेनुसार गणेश चतुर्थीत घुमट आरत्यांना मोठे महत्त्व आहे. घुमटाबरोबर तालवार वाजणारे ताशे, कासाळे यांच्या सुंदर मिलाफाने बहरणाऱया आरत्यांनी अंगात एक भक्तीमय चैतन्य निर्माण होत असते. आजही या घुमट आरत्यांची क्रेझ ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्येही कायम आहे. शहरी भागातील विविध वाडय़ावरील युवक आज गटागटाने घुमट आरत्यांचा सराव करताना दृष्टीस पडत आहेत. या घुमट-ताशांचे दूरवर येणारे निनाद ‘बाप्पा’च्या आगमनाची चाहूल देत आहेत. आता पूर्णपणे पक्का सराव करून चतुर्थीच्या काळात घराघरामध्ये गटाने फिरून आरत्या सादर कराव्यात असा या युवक गटांचा नियम असतो. वाडय़ावरील घरे व वेळ यांची सांगड घालत मोजक्याच आरत्या सादर करून गणेशाची सेवा करणे हा या युवकांचा मुख्य हेतू असतो.

श्री गणेशाच्या सेवेमुळे मनाला समाधान

घराघरामध्ये फिरून आरत्या सादर करणे म्हणजे श्री गणेशाची सेवा व त्याच्यासमोर त्याची स्तुती करण्याचे भाग्य या युवकांना लाभत असते. आरत्या मोजक्याच म्हटल्या जातात. ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही गणपतीची प्रमुख आरती तसेच ‘दुर्गे दुर्घट भारी’, ‘लवथवती विक्राळा’ या देवी व शंकाराच्या आरत्यांसमवेत सर्वांची प्रिय असलेली ‘हे भोळय़ा शंकरा’ तसेच श्री विठ्ठलाची ‘येई हो विठ्ठले’ व इतर आरत्या सोय व वेळेनुसार गायल्या जातात. तसेच एखादी गजलही सादर करण्याचे कसब हे बजावले जाते. या सर्वांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थनेने आरत्यांची सांगता करतात. या सर्व आरत्या विविध वाडय़ांवरील युवक आपापल्या शैलीत स्वयंचलीत चाली किंवा मुळ चालीत काहीसा फरक करून त्याच पद्धतीने गाऊन घुमट, ताशा व कासाळे यांचे संगीत याचा मिलाफ करून त्या दरवर्षी नवनवीन ढंगात देवासमोर सादर करतात. घरोघरी गणेशासमोर आरत्या सादर करताना गणेशाची सेवा होतेच. शिवाय सर्वांगाला, मनाला समाधान लाभते, असे गावकरवाडा-डिचोली येथील कृषम नार्वेकर, कृतेश नार्वेकर, साहिल मांद्रेकर, सोहम परब, प्रितेश गावकर यांनी सांगितले.

गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये रात्री लागू लागल्या

गणेश चतुर्थीला दीड-दोन महिने असतानाच गणेशमूर्ती कलाकार मूर्तीकामाला सुरुवात करतात. आता त्यांच्या कामाला वेग आलेला आहे. सर्व प्रकारच्या लहान मोठय़ा गणेशमूर्तींना पूर्णपणे स्वरुप देऊन आता त्यांचे रंगकाम करण्यात मूर्तीकार गुंतलेले आहेत. काही चित्रशाळांमध्ये रंगकामासाठी विशेष कलाकारांना पाचारण करून कामाला वेग देण्यात आलेला आहे. मूर्तीकलेची परंपरा पिढय़ानपिढय़ा जपणारे कलाकार गोव्यात आज मोठय़ा प्रमाणात आहेत. तसेच त्यांच्या साथीला आता नवीन दमाच्या युवा कलाकारांनीही आपल्या अंगातील कलेला गणेशमूर्ती कलेत वाट मोकळी करून दिली आहे.

आज गोमंतकात मोठय़ा प्रमाणात युवा चित्रकला गणेशमूर्ती कलेत पुढे येताना दिसत आहेत. छंद म्हणून जोपासलेली कला अनेकांसाठी व्यवसायाचे साधन बनलेले आहे. अनेक कलाकारांच्या पूर्वीच्या पिढय़ांना या कलेचा गंधही नव्हता. केवळ छंद म्हणून सुरू केलेली कला आज अनेकांसाठी व्यवसाय बनलेली आहे. त्यामुळे लोकांनाही आपापली मूर्ती ठरवताना आपल्या आवडी-निवडीनुसार ठरविली जाते.

गणेशमूर्ती कला म्हणजे आा आमच्या जीवनाचा एक घटक बनलेला आहे. दरवर्षी लोकांच्या अपेक्षेनुसार मूर्ती घडविणे व त्यांच्या मूर्ती बघताचक्षणी त्यांच्या चेहऱयावर समाधानाचे भाव पाहणे, हेच या कलेमागचे खरे समाधान आहे. यामुळे आम्हाला प्रोत्साहन व स्फूर्ती मिळत असते. पुढच्या वर्षी यापेक्षाही अधिक चांगली कला मूर्तीद्वारे लोकांच्या घरी पोहोचविण्याची अशी भावना युवा मूर्ती कलाकार विठ्ठलापूर-सांखळी येथील स्वप्नील पुजारी यांनी व्यक्त केली.