|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जपानच्या कौन्सुल जनरलची एमपीटीला भेट

जपानच्या कौन्सुल जनरलची एमपीटीला भेट 

प्रतिनिधी/ वास्को

जपानचे कौन्सुल जनरल रेवजी नोडा यांनी जपानच्या काही अधिकाऱयांसह एमपीटीला नुकतीच भेट दिली. एमपीटीच्या प्रशासकीय इमारतीत एमपीटीचे उपाध्यक्ष जी. पी. राय यांनी त्यांचे स्वागत केले. एमपीटीचे उपाध्यक्ष व विभाग प्रमुखांशी जपानच्या कौन्सुल जनरलनी चर्चा केली. एमपीटीचे वाहुतक व्यवस्थापक विपीन मॅनोथ यांनी मुरगांव बंदर, बंदराचा इतिहास, व्यापारासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा व मालवाहतुक सुविधांविषयी माहिती दिली.

जपानला गोव्याचा अभ्यास करायचा आहे. गोव्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची ईच्छा आहे असे उद्गार कौन्सुल जनरलनी बैठकीत काढले. भारतातील गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ अशा राज्यांमध्ये व्यापार वाढवण्यास जपान उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये आम्ही भूमीगत मेट्रो प्रकल्प हाती घेत आहोत. जपानमधील ओसाका आणि योकाहामा बंदरानी मुंबई बंदराशी संबंध जोडलेले आहेत. मुरगाव बंदरानेसुध्दा जपानमधील इतर बंदरांशी अशाच प्रकारे सहकार्याचे नाते जोडावे. जपान आणि भारत एकत्रीतरीत्या विविध क्षेत्रात कार्य करू शकतो. जपानचे सरकार भारतातील जनता आणि जपानमधील जनतेशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापीत करू ईच्छीत असल्याचे व त्या दिनेशे कार्य करीत असल्याचे जपानचे कौन्सुल जनरल म्हणाले.

बंदरातील भावी विकासासंबंधी व होऊ घातलेल्या प्रकल्पांसंबंधी माहिती यावेळी त्यांना एमपीटीतर्फे देण्यात आली. मुरगाव बंदरावर आधारीत एक लघुपटही त्यांना दाखवण्यात आला.