|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नाला अपयश

बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नाला अपयश 

वार्ताहर / निपाणी

हालसिद्धथनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी 15 रोजी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत होती. कारखान्यावर पडणार निवडणुकीच्या खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी आजची संधी साधण्यासाठी सर्वानीच प्रयत्न केले. त्यातून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नांनी पाराकाष्टा करण्यात आली. पण त्याला अपयश आले. त्यामुळे अखेर निवडणूक लागलीच. यामुळे नाराजी व्यक्त होत असून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे.

रविवारी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळी निवडणूक अधिकारी एस. एस. बिरादार यांच्या उपस्थितीत माघारीची प्रक्रिया सुरु झाली. सुरुवातीला विकास पॅनेलतर्फे दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी केवळ 16 अर्ज राखून अतिरिक्त उमेदवारांनी माघार घेतली. याचवेळी प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केलेल्या सामान्य, ओबीसी, महिला, एसटी गटातील सर्व उमेदवारांनी ब गटातील प्रा. जोशींच्या किंवा सुजित जोशींच्या बिनविरोध निवडीच्या समझोत्यावर आपले अर्ज बिनशर्त माघार घेतले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सन्मानपुर्वक बळ प्राप्त झाले.

प्रा. जोशी गटाच्या उमेदवारांच्या माघारीमुळे सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलनच्या तीन जागा बिनविरोध होण्यास मार्ग मोकळा झाला. यातून ओबीसी अ गटातून म्हाळाप्पा सिद्राम पिसोत्रे-गळतगा, राजाराम मल्हारी खोत-आप्पाचीवाडी, तर एसटी गटातून कल्लाप्पा भिमा नाईक-हुन्नरगी यांची संचालक म्हणून नव्या चेहऱयांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ब गटासह सामान्य व सामान्य महिला गटातून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न झाले. पण उमेदवारांनी माघारीच्या प्रयत्नांना प्रतिसाद न दिल्याने बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फोल ठरले.

ब गटातून 1 जागेसाठी प्रा. जोशी गटाचे सुजित जोशी विरुद्ध स्वाभिमानीचे नरेश सवदी यांच्यात निवडणूक लागली आहे. बिनविरोध निवडणुकीच्या समझोत्यातून या गटातील विकस पॅनेलच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. महिला गटातून 2 जागांसाठी विकास पॅनेलच्या उज्वला शिंदे-भिवशी, मनिषा रांगोळे -अकोळ, स्वाभिमानीच्या कांचन खोत-नांगनूर, अपक्ष साधना संकपाळ या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. एससी वर्गाच्या 1 जागेसाठी विकस पॅनेलतर्फे प्रतप मेत्राणी-निपाणी, अपक्ष गजेंद्र पोळ-निपाणी, प्रभाकर भिमन्नावर-मांजरी, शरद कांबळे-हंचिनाळ केएस, श्रीमंत म्हेस्त्राr-सौंदलगा असे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सामान्य गटातील 9 जागांसाठी विकास पॅनेलतर्फे आप्पासाहेब जोल्ले-एकसंबा, अविनाश पाटील-नांगनूर, विश्वनाथ कमते-खडकलाट, चंद्रकांत कोठीवाले-निपाणी, मलगोंडा पाटील-जत्राट, रामगोंडा पाटील-जनवाड, रामगोंडा उर्फ पप्पू पाटील-रामपूर, समित सासणे-पडलिहाळ, सुकुमार पाटील-बुदिहाळ तर स्वाभिमानीतर्फे श्रीकांत संकपाळ-बुदिहाळ, मलगोंडा तावदारे-बेनाडे, मधूकर पाटील-पडलिहाळ, दत्तात्रय खोत-निपाणी, बाबासो खोकाटे-जत्राट, मधूकर पाटील-कुर्ली, सुनील शितोळे-मनोचिवाडी, राजगौडा जयाप्पगोळ-बेडकिहाळ, अपक्ष रामू मधाळे-जनवाड, अनंत परगौडन्नवर-सदलगा, अनिल संकपाळ-बुदिहाळ, सोमेश पाटील-गळतगा असे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बिनविरोधसाठी प्रयत्न पण…..

हालशुगरवर वाढलेला कर्जाचा बोजा व निवडणूक खर्चातून वाढणारा बोजा कारखान्याच्या प्रगतीसाठी मारक ठरणार आहे. यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सभासदातून व्यक्त होत होती. याला प्रतिसाद देत सर्वपक्षीयांनी बिनविरोधासाठी प्रयत्न केले. प्रा. जोशी गटाने तर उमेदवारी माघार घेत बिनविरोधचा मार्ग मोकळा केला. त्यातून बिनविरोधच्या अपेक्षा वाढल्या. यानुसार प्रत्यन होताना माघारीची वेळही वाढवून घेण्यात आली. पण तीन संचालकां व्यतिरिक्त सर्व 13 संचालक पदांच्या जागेसाठी निवडणूक लागली.

तरुण भारतच्या वृत्तातीच चर्चा

हालशुगर निवडणूक जाहीर झाल्यापासून तरुण भारतने बिनविरोध निवडणूक कारखान्याच्या हिताची असा विषय उचलून धरला होता. 9 रोजीच्या दैनिकात खर्चाचा बोजा वाढविण्यासाठी आजच संधी अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताना बिनविरोधमधून 50 लाखांची बचत, राजकीय इर्षेपेक्षा कारखान्याचा विचार व्हावा असे आवाहन केले होते. या आवाहनानुसार सर्वपक्षियांनी बिनविरोधसाठी प्रयत्नही सुरु केले होते. यावेळी कारखानास्थळी दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची चर्चा सुरू होती.