|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हाणामारी प्रकरणी नगरसेवकासह तिघांना अटक

हाणामारी प्रकरणी नगरसेवकासह तिघांना अटक 

प्रतिनिधी / बेळगाव

राजकीय वादातून आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या समर्थकांत आठ दिवसांपूर्वी उज्ज्वलनगर परिसरात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी माजी नगरसेवकावर चाकू हल्ल्याचाही प्रकार घडला होता. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी रविवारी नगरसेवकासह तिघा जणांना अटक केली आहे.

नगरसेवक मतीन निसारअहमद शेखअली (वय 35, रा. कोतवाल गल्ली), दानिश युसुफ चाँदवाले (वय 19), जैफ युसुफ चाँदवाले (वय 22, दोघेही रा. जालगार गल्ली) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भा. दं. वि. 143, 147, 148, 448, 326, 307, 324, 323, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता.

माळमारुतीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी या तिघा जणांना अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायाधीशांसमोर हजर केले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

गेल्या सोमवारी 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी उज्वलनगर येथे हाणामारीची घटना घडली होती. माजी नगरसेवक फिर्दोस दर्गा (वय 52), परवेज दर्गा (वय 54), कुरकान दर्गा (वय 24, तिघेही रा. श्रीनगर) यांच्याबरोबरच रविवारी अटक करण्यात आलेले तिघेही जखमी झाले होते. फिर्दोस यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. सर्व सहा जखमींना वेगवेगळय़ा खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

रविवारी नगरसेवक मतीन शेखअलीसह तिघा जणांना इस्पितळातून घरी जावू देण्यात आले. त्यानंतर लगेचच माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. ऑटोनगर येथील माळी मंच या मंगल कार्यालयात झालेल्या एका लग्न समारंभात एकमेकांकडे रागाने पाहिल्याचे निमित्त होऊन ही हाणामारी झाली होती.